पालकमंत्र्यांकडून टंचाईचा आढावा
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-13T23:49:27+5:302014-07-14T01:03:00+5:30
हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा.

पालकमंत्र्यांकडून टंचाईचा आढावा
हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा. तसेच पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीमध्ये संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. खा. अॅड. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ. जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य रामराव वडकुते, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते.
प्रा. गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.
तसेच प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत दक्षता घेण्याची सूचना प्रा. गायकवाड यांनी केली. टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची व टंचाईच्या भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची माहिती दिली. यात जिल्ह्यात ९ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून यापैकी ४ हजार ६०० हेक्टरवर कापूस व २ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे.
प्रशासनाने टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेवून जिल्ह्यात झालेली पेरणी क्षेत्र, पावसाचे प्रमाण, पाण्याची सद्य:स्थिती याचा अहवाल आपल्याकडे द्यावा, याबाबतची बैठक मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे घेण्यात येईल, असे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधी उपस्थित
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी बैठकीत संभाव्य टंचाई- सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना दिली.
जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, या करिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.
टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.