मुख्य सचिवांकडून पीक परिस्थितीचा आढावा
By Admin | Updated: November 4, 2014 01:39 IST2014-11-04T01:07:30+5:302014-11-04T01:39:24+5:30
औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत

मुख्य सचिवांकडून पीक परिस्थितीचा आढावा
औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत आज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. १५ नोव्हेंबरपूर्वी सुधारित आणेवारी जाहीर करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना यावेळी मुख्य सचिवांनी दिल्या.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह कृषी, जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मराठवाड्यातील परिस्थितीविषयी माहिती सादर केली. सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने औरंगाबाद, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांना २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. टंचाई परिस्थिती लक्षात घेता वेळेवर आणेवारी जाहीर करण्यासाठी पावले उचलावीत, त्यासाठी लवकरात लवकर पीक कापणीचे प्रयोग घ्यावेत, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. आतापर्यंत विभागात महसूल खात्यातर्फे पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग घेण्यात आले असून, उर्वरित ठिकाणी प्रयोग घेण्याची कारवाई सुरू असल्याचे याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी सांगितले. खरिपाच्या सर्व पिकांच्या कापणीचे प्रयोग घेऊन १५ नोव्हेंबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे, तर अंतिम आणेवारी डिसेंबर महिन्यात जाहीर केली जाईल. या बैठकीला मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत कृषी आणि पुनवर्सन विभागाचे सचिवही उपस्थित होते, तर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, कृषी विभागाचे सहायक संचालक जनार्दन जाधव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एन.व्ही. शिंदे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
आणेवारी काढण्यासाठी महसूल विभाग पीक कापणीचे प्रयोग घेत आहे. दुसरीकडे कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी कापणीचे प्रयोग सुरू केले आहेत. मात्र, कृषी विभागाने आतापर्यंत विभागात मूग, उडीद आणि सोयाबीन या तीन पिकांचे केवळ ८७० प्रयोग घेतले आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.