फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST2021-04-04T04:05:02+5:302021-04-04T04:05:02+5:30
फुलंब्री : तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला भेट ...

फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
फुलंब्री : तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला भेट देऊन उपयोजना संदर्भात आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. येथे येणाऱ्या रुग्णाची कोरोना तपासणी व्यवस्थितपणे केली जात आहे का, याची विचारपूस केली. उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, तहसीलदार शीतल राजपूत, नगरपंचायत मुख्याधिकारी नंदा गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अभिजीत खंदारे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश साबळे यांच्यासोबत चर्चा केली. ग्रामीण रुग्णालयात २५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, ही संख्या ३० करावी, तसेच कोरोना लसीकरणाची जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
बिल्डा कोविड सेंटरमध्ये रुग्णांशी साधला संवाद
बिल्डा येथील कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. येथे कोरोना संक्रमित ६० रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्याशी संवाद साधला. उपचार घेऊन घरी, आपल्या गावी गेल्यावर शेजारी व नातेवाइकांना मास्क वापरणे व कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करावे, असा प्रचार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
----
‘त्या’ नगरसेवकाची केली कानउघडणी
दरम्यान, फुलंब्री नगरपंचायतचे नगरसेवक राउफ कुरेशी यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन शहरातील व्यापाऱ्याची कोरोना चाचणी सक्तीची करू नये, नसता आंदोलन केले जाईल, असे निवेदन दिले होते. त्या नगरसेवकाला जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात बोलावून घेऊन चांगलीच कानउघडणी केली. आंदोलन करणार असाल तर गुन्हा दाखल करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत काळे, योगेश मिसाळ, डॉ.शेख सिकंदर, डॉ.ताठे यांची उपस्थित होते.
-----------
फोटो कॅप्शन : कोविड सेंटरमधील रुग्णाशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.