वाळूमाफियांना ‘महसुली’ दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:07 IST2016-05-08T23:59:20+5:302016-05-09T00:07:37+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच वाळूचा अधिकृत उपसा सुरू आहे.

'Revenue Receipts' to Walmart | वाळूमाफियांना ‘महसुली’ दणका

वाळूमाफियांना ‘महसुली’ दणका

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच वाळूचा अधिकृत उपसा सुरू आहे. चोरट्या मार्गाने शहरात मोठ्या प्रमाणात वाळू येत असल्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने शुक्रवारी मध्यरात्री धडाकेबाज कारवाई केली. बीड रोड आणि जळगाव रोडवर चोरटी वाहतूक करणारी आठ वाहने पकडण्यात आली. महसूलच्या या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाने उन्हाळा सुरू होण्यापूर्वी विविध नदीपात्रातील वाळू उपशासाठी जाहीर प्रगटन दिले. प्रशासनाच्या या आवाहनाला वाळूमाफियांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. फुलंब्री आणि सिल्लोड येथे वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात येत आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार या भागात वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफियांसाठी नंदनवन म्हणजे गोदा पात्र होय.
गोदावरीच्या पात्रात एकाही वाळूपट्ट्याचा लिलाव करण्यात आलेला नाही. अवैधरीत्या काही वाळूमाफियांनी गोदापात्रातून व्यापक प्रमाणात वाळू उपसा सुरू केल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत पथकाने जळगाव रोड, बीड रोडवर कारवाई केली. हायवा वाहनांसह काही ट्रकही पकडण्यात आले. एकूण कारवाईत आठ वाहने जप्त करण्यात आली. या वाहनचालकांकडे खाडाखोड केलेल्या रॉयल्टीच्या चिठ्ठ्या सापडल्या. महसूलचे पथक वाळू कोणत्या नदीपात्रातून उचलण्यात आली याचा शोध घेत आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार मुंडलोड यांनी सांगितले. कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत काळे, मंडळ अधिकारी सतीश देशमुख, वाहनचालक जाधव आदींची उपस्थिती होती.

Web Title: 'Revenue Receipts' to Walmart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.