महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच ‘आपत्ती’कडे पाठ !
By Admin | Updated: December 12, 2014 00:52 IST2014-12-12T00:48:59+5:302014-12-12T00:52:48+5:30
उस्मानाबाद : आपत्ती केव्हाही येवू शकते, त्यामुळे सर्वसामान्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आपत्तीचा मुकाबला करता यावा, मोठा अनर्थ

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच ‘आपत्ती’कडे पाठ !
उस्मानाबाद : आपत्ती केव्हाही येवू शकते, त्यामुळे सर्वसामान्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आपत्तीचा मुकाबला करता यावा, मोठा अनर्थ टळावा याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते़ मात्र, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाकडे चक्क महसूलच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली़ प्रांगणातील रिकाम्या खुर्चा पाहून उपस्थित नागरिकांनी यावेळी संतापही व्यक्त केला़
आपत्ती केंव्हाही येऊ शकते, त्यामुळे येणाऱ्या आपत्तीचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी सर्वांना दक्षतेबाबत माहिती असणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या वतीने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आदींसाठी महाराष्ट्र आपत्ती धोके व व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आपत्तीवरील नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिके घेवून माहिती देण्यात येत आहे़ येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ मात्र, या प्रशिक्षणाकडे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच पाठ फिरविली़ मोजकेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याने इतर खुर्च्या रिकाम्याच होत्या़ यावेळी सुनील तिवारी आणि महेशकुमार यांनी आपल्या भागातील येणाऱ्या आपत्तीच्या काळात आपण काय केले पाहिजे ? काय करू नये ? याबाबत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात तेलोरे यांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून परिस्थितीवर मात करावी, असे आवाहन केले. तसेच आपत्तीच्या काळात तत्काळ निर्णय घेऊन कमी धोके कसे होतील, याची कला आत्मसात करावी, असेही त्यांनी सांगितले.
ठिकठिकाणी होणार प्रात्यक्षिके
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक पुणे यांच्याकडून शुक्रवारी उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर सकाळी ९ ते १०.३० या काळात जिल्ह्यातील सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व रहिवाशी यांच्यासाठी तर माकणी येथील भारत विद्यालय व भारत कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी २ ते ४ या वेळेत सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी हे प्रशिक्षण होणार आहे. तसेच मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ पर्यंत सर्व शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण होणार आहे. (प्रतिनिधी)