महसूल विभाग ठप्प

By Admin | Updated: July 25, 2014 00:48 IST2014-07-25T00:36:40+5:302014-07-25T00:48:21+5:30

औरंगाबाद : नेहमी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन त्यांची निवेदने स्वीकारणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज स्वत:च जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

Revenue Department jam | महसूल विभाग ठप्प

महसूल विभाग ठप्प

औरंगाबाद : नेहमी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन त्यांची निवेदने स्वीकारणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज स्वत:च जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. हिंगोली येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईविरुद्ध या अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा टाकून हे आंदोलन केले. आंदोलनात नायब तहसीलदारांपासून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारनंतर जिल्हाधिकारी वगळता इतर एकही अधिकारी उपस्थित नव्हता. विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये आणि तहसील कार्यालयांमध्येही अधिकारी नव्हते. सर्वच अधिकाऱ्यांनी सकाळी कामावर येताच सामूहिक रजेचे अर्ज दिले होते. दुपारी १२ वाजता हे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. यावेळी अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळात अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, रिता मेत्रेवार, स्वाती कारले, संभाजी अडकुणे, रवींद्र कटके, संजीव जाधवर, बप्पासाहेब थोरात, तहसीलदार विजय राऊत आदींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, बोधवड यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिलेला असताना हिंगोली पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे बोधवड यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, कोणत्याही महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध अटकेची कारवाई होणार नाही, असे स्पष्ट लेखी आदेश गृह विभागास देण्यात यावेत, आकसापोटी अटक करणारे पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांना तात्काळ निलंबित करावे.
मराठवाड्यात ५९२ अधिकारी रजेवर
औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील महसूल अधिकारी आज दिवसभर रजेवर होते. त्यामुळे संपूर्ण महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले.
या आंदोलनात विभागातील ९ अप्पर जिल्हाधिकारी, ९६ उपजिल्हाधिकारी, ११३ तहसीलदार, ३७४ नायब तहसीलदार, असे ५९२ अधिकारी सहभागी झाले.

Web Title: Revenue Department jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.