कोर्टाची तारीख वाढवून देण्यासाठी लाच घेतांना सेवानिवृत्त महिला कोतवाल अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 20:51 IST2017-10-13T19:27:33+5:302017-10-13T20:51:55+5:30
तहसीलदारांकडे चालू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणात तारीख वाढवून देण्यासाठी चारशे रुपयांची लाच घेतांना सेवानिवृत्त महिला कोतवालास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे़.

कोर्टाची तारीख वाढवून देण्यासाठी लाच घेतांना सेवानिवृत्त महिला कोतवाल अटकेत
औरंगाबाद, दि. १३ : तहसीलदारांकडे चालू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणात तारीख वाढवून देण्यासाठी चारशे रुपयांची लाच घेतांना सेवानिवृत्त महिला कोतवालास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे़. ही कारवाई शुक्रवारी (दि़१३) दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात करण्यात आली़. शकुंतला गोपीनाथ जाधव (६१, रा़चुनभट्टी, खोकडपुरा) असे आरोपीचे नाव आहे़
महिन्याभरापुर्वी रेल्वसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीवर लोहमार्ग पोलिसांनी प्रतिबंधात्क करवाई केली होती़. या प्रकरणात तालुका दंडाधिका-यांकडे सुनावणी होती़. मात्र, तहसिलदारांनी या प्रकरणात सुनावणी न घेता पुढील तारखेत हजर राहण्याचे सांगीतले़. यावेळी पुढची तारीख लांबची देण्यासाठी शकुंतला यांनी आरोपीकडे पाचशे रुपयांची लाच मागीतली़. तडजोड करून पाचशे ऐवजी चारशे रुपये देण्याचे ठरले़ आरोपीने नातेवाईकाकडून पैसे आणून देतो असे सांगून थेट जुना बाजार येथील लाच लुचपतप्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली़. तक्रारीनंतर पथकाने तातडीने सापळा रचून शकुंतला जाधव यांना चारशे रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले़
सेवा निवृत्त तरीही कार्यालयात
शकुंतला ह्या वर्षाभरापुर्वीच कोतवाल या पदावरून सेवा निवृत्त झालेल्या आहेत़ तरी त्या तहसिल कार्यालयात येऊन बसत़. त्यांना कार्यालयातील अधिकारी संचिका देखील या टेबलवरून त्या टेबलवर पाठवण्यासाठी देत असल्याचे एसीबी पथकाच्या निदर्शनास आले आहे़. या प्रकरणात अधिका-यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे एसीबीच्या अधिका-यांनी सांगीतले़