पर्यवेक्षिकांच्या परीक्षेचा दोन तासात निकाल
By Admin | Updated: May 18, 2015 00:26 IST2015-05-18T00:01:01+5:302015-05-18T00:26:07+5:30
बीड : पर्यवेक्षिकापदासाठी रविवारी अंगणवाडीसेविकांची परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. परीक्षेनंतर अवघ्या दोन तासात निकाल जाहीर करण्यात आला.

पर्यवेक्षिकांच्या परीक्षेचा दोन तासात निकाल
बीड : पर्यवेक्षिकापदासाठी रविवारी अंगणवाडीसेविकांची परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. परीक्षेनंतर अवघ्या दोन तासात निकाल जाहीर करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे सोमवारी मुलाखती असून लगेचच निवड यादीही लावण्यात येईल.
बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत पर्यवेक्षिकांच्या ३५ जागांसाठी भरती होत आहे. अंगणवाडीसेविकांमधूनच पदे भरावयाची आहेत. १० वर्षांपेक्षा अधिक सेवा, दहावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडीसेविकांकडून अर्ज मागविले होते. ३५ जागेसाठी ७४२ अर्ज आले होते. रविवारी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत ७५ गुणांची परीक्षा गुरुकुल स्कूल व चंपावती विद्यालयात झाली. १२ उमेदवारांनी दांडी मारली. ३५ पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या ९८ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यांची यादी जि.प. च्या संकेतस्थळावरही उपलब्ध केली आहे.
परीक्षाप्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि.प. सीईओ नामदेव ननावरे, बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. ए. इनामदार ठाण मांडून होते.
गुणवत्ता, सेवाज्येष्ठतेला प्राधान्य
७५ गुणांच्या लेखी परीक्षेनंतर सोमवारी सकाळी दहा वाजता ९८ पात्र उमेदवारांतून ३५ पर्यवेक्षिकांची निवड केली जाणार आहे.
सेवाज्येष्ठता, गुणवत्तेनुसार प्राधान्य राहणार असून सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व व बालप्रकल्पाविषयीचा अभ्यास पाहून गुण दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
चंपावती परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांनी मोबाईलचा वापर केला. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग झाला, अशी तक्रार कास्ट्राईबच्या अरूणा आठवले यांनी केला आहे.
४मोबाईल वापरणाऱ्या उमेदवारांसह संबंधित परीक्षा कक्षावरील कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
चिठ्ठीमुळे यंत्रणा कामाला
४चंपावती केंद्रावर परीक्षा प्रक्रिया सुरू असताना एका खिडकीतून एक कागद आत फेकण्यात आला. काही उमेदवारांनी हा कागद कॉपीशी संबंधित असल्याचा आरोप केला. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी तो कागद ताब्यात घेतला. या कागदाची तपासणी केली असता त्यावर प्रश्नपत्रिकेसंदर्भात कोणताच मजकूर नसल्याचे आढळून आले. सदरील चिठ्ठी जप्त केली आहे.