विद्यार्थी, नोकरदार, टपाल सेवेवर परिणाम

By Admin | Updated: December 18, 2015 23:30 IST2015-12-18T23:22:12+5:302015-12-18T23:30:43+5:30

लोहा : राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक, यांत्रिकीसह इतर विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वेतनवाढीसह इतर प्रमुख मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारल्यामुळे बससेवा ठप्प झाली.

Results of students, employers, postal services | विद्यार्थी, नोकरदार, टपाल सेवेवर परिणाम

विद्यार्थी, नोकरदार, टपाल सेवेवर परिणाम

लोहा : राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक, यांत्रिकीसह इतर विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वेतनवाढीसह इतर प्रमुख मागण्यांसंदर्भात १७ रोजीच्या पहाटेपासून बेमुदत संप पुकारल्यामुळे बससेवा पूर्णत: ठप्प झाली. बसवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, टपालसेवेसह इतर महत्त्वपूर्ण व्यवहार बंद पडल्याने प्रवाशांसह सर्वसामान्यांना फटका बसला़ तालुक्यातील १८ टपाल शाखांची सेवा संपामुळे विस्कळीत झाली़ त्यामध्ये आडगाव, आष्टूर, बेरळी, बेटसांगवी, दगडगाव, डोंगरगाव, तव्हराळ, माळाकोळी, माळेगाव, पेनूर, रायवाडी, रिसनगाव, सावरगाव (ऩ), शेवडी बा़, सोनखेड, सुनेगाव येथील महत्त्वपूर्ण सेवा ठप्प पडली़ संपाचा बाजारपेठेवरसुद्धा परिणाम झाला़ संपात एसटी कामगार कर्मचारी संघटनेचे मनोहर लांडगे, सुरेश रेणकुंटवार, शंकर दुलेवाड, संजय हांगरगे, व्ही़एम़लासे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़
बसस्थानकात शुकशुकाट
नरसीफाटा : राज्यातील बसेसची चाके थांबल्याने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील बसही या संपामुळे बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली़ तर येथील बसस्थानकात शुकशुकाट पसरला आहे़ दुसऱ्या दिवशीच्या संपामुळेही सामान्य जनतेसह प्रवासी, विद्यार्थी, नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली़ शेवटी खाजगी वाहनांचा सहारा घेण्याची वेळ आली़ या संपाची झळ नायगाव येथील आठवडी बाजारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेलाही पोहोचली़ नरसी बसस्थानकातून दररोज २५० ते ३०० च्या जवळपास एसटी बसेसची ये-जा होत असते़ तर बसस्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी असते़ पण गेल्या दोन दिवसांपासून संपामुळे एकही बस स्थानकात आली नसल्याने या बसस्थानकात शुकशुकाट आहे़ (वार्ताहर)
बस जागेवरच!
निवघा बाजार : एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याने बस रस्त्यावर धावल्याच नाहीत़ प्रवासी व नागरिक बाहेर निघालेच नसल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले़ नागरिकांनी वृत्तपत्र व विविध न्यूज चॅनलच्या बातम्यामधून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नसल्याचे माहीत झाल्याने नागरिक उगीच त्रस्त नको म्हणून घरीच राहणे पसंत केले़ परिणामी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते़ बाजारपेठही सुन्न होती़ व्यापाऱ्यांवर याचा परिणाम झाला़ विद्यार्थीही शाळेत गेले नाहीत़ दोन दिवसांपासून वृत्तपत्राचे गठ्ठे हदगाव बसस्थानकात पडून असल्याने वाचकांचीही गैरसोय झाली़(वार्ताहर)
दोन दिवसांत आठ लाखांचा फटका
किनवट : एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही बेमुदत संपात सहभाग कायम असल्याने एसटी बसेसचा चक्का जामच राहिल्याने दोन दिवसांत आठ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसला़
दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प बनल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले़ या संपात किनवट आगाराचे एस़एस़ बाभूळकर, ए़ ए़ आलमवाले, सिद्धार्थ महाबळे, सटलावार, विनोद नेम्मानीवार, विजय परसोडे, सुभाष भंडारवार, रवी डोंगरे, दिनेश कांबळे, एऩबी़अंगरवार, ई़एस़चव्हाण, लक्ष्मण पलकोडावार, बालाजी केंद्रे, सुभाष धनवे, संजु मुंढे, आऱहिरमेठ, संजय आष्टीकर, डी़ ही़ गेडाम यासह इतर कामगार स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते़ या संपाचा फटका मानव विकासच्या बसने मोफत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना बसला़ शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच विद्यार्थ्यांना पैसे मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला़ मानव विकासच्या पाचही बसेसने दोन दिवसात फेऱ्याच न मारल्याने प्रतिदिवशी ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना ने-आण पोटी सात-साडेसात हजार रुपये, दोन दिवसात १५ हजार हजार रुपयांची झळ विद्यार्थ्यांच्या पालकांना बसली आहे़ (वार्ताहर)
वाहतूकदारांची चांदी
मुक्रमाबाद : एसटी संपामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट झाला. यामुळे अवैध वाहतूकदारांची मात्र चांदी झाली़ यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय व वृत्तपत्राच्या पार्सलची मात्र वाट लागली़ यातच टपाल खाते एसटी वाहतुकीने असल्याने पोस्ट आॅफीसमध्ये पार्सन न आल्याने शुकशुकाट दिसून येत आहे़
मुक्रमाबाद हे शहर उदगीर-देगलूरच्या मध्यभागी असल्याने येथून एसटीच्या ५०च्यावर फेऱ्या आहेत़ मुखेड-मुक्रमाबाद, औराद-मुक्रमाबाद, सावरमाळ-हंगरगा-बावलगा या मार्गावरही एसटीची वाहतूक असते़ एसटी बंद असल्याने अवैध वाहतुकीचा सहारा घ्यावा लागला. (वार्ताहर)

Web Title: Results of students, employers, postal services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.