कचऱ्याची जबाबदारी पोलिसांच्या माथ्यावर
By Admin | Updated: December 30, 2015 00:47 IST2015-12-30T00:26:23+5:302015-12-30T00:47:01+5:30
औरंगाबाद : रस्त्यावर वाळू, विटा, खडी यासारखे बांधकाम साहित्य आणि कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत,

कचऱ्याची जबाबदारी पोलिसांच्या माथ्यावर
औरंगाबाद : रस्त्यावर वाळू, विटा, खडी यासारखे बांधकाम साहित्य आणि कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे पत्र महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध पोलीस ठाण्यांना दिले आहे.
महानगरपालिकेने कॅरिबॅगच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. कॅरिबॅगचे मुख्य विक्रेते आणि व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यासोबतच आता रस्त्यावर कचरा टाकून रस्ते घाण करणारे तसेच रस्त्यावर वाळू, खडी व बांधकाम साहित्य टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्धही कारवाईचा निर्णय मनपाने घेतला आहे. अशा नागरिकांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे पत्रच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. शहरात रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक ते पैठणगेट, रेल्वेस्टेशन ते घाटी हॉस्पिटल, छावणी ते विद्यापीठगेट ते हर्सूल टी-पॉइंट ते सिडको बसस्थानक, केम्ब्रिज शाळा ते महावीर चौक, सिडको बसस्थानक ते रोशनगेट, आझाद चौक, टी.व्ही. सेंटर ते एन-६, सेव्हन हिल ते गारखेडा शिवाजीनगर आदी प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, चहाचे कप, ओला, सुका कचरा, रेती, खडी रस्त्यावर टाकून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला जात आहे. नागरिक, व्यापारी, मांस विक्रेते रस्त्यावर कचरा टाकत आहेत. अशा व्यक्तींच्या विरोधात मुंबई पोलीस अॅक्ट व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.