राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात प्रतिसाद
By Admin | Updated: October 3, 2014 00:38 IST2014-10-03T00:27:43+5:302014-10-03T00:38:36+5:30
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात प्रतिसाद
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला विद्यानगर, न्यायनगरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत महिलांनी लक्षणीय उपस्थितीसह सक्रिय सहभाग घेतला. रांगोळी काढून आणि औक्षण करून राजेंद्र दर्डा यांचे महिलांनी उत्साहात स्वागत केले. राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या आवाहनाला महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला.
राणानगर ते विद्यानगर या भागातील प्रत्येक गल्लीमध्ये महिला पदयात्रेची आतुरतेने वाट पाहत होत्या. राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नांमुळेच या भागाचा विकास होऊ शकला. ज्या रस्त्यांवरून पूर्वी चालणे कठीण होते, तेच रस्ते आज चकाचक झाल्याने आमच्या भागाचे रंगरूपच पालटले आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. ड्रेनेजलाईन, खुले रंगमंच, सामाजिक सभागृहांमुळे या भागाचा चेहरामोहराच बदलला आहे. राजेंद्र दर्डा यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या आहोत, अशी ग्वाही यावेळी महिलांनी दिली.
पदयात्रा ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने पुढे जात होती. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. न्यू विशालनगर, सारंग सोसायटी, संदेशनगरमार्गे रोशन सोसायटी भागात पदयात्रा पोहोचली.
माजी आमदार नितीन पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह या पदयात्रेत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. न्यायनगर, हुसेन कॉलनीत राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील नागरिकांकडून सत्कार स्वीकारले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले.
पदयात्रा पुंडलिकनगर भागातील चौंडेश्वरी सोसायटी, भूषणनगरमार्गे स्वामी समर्थ कमानीपर्यंत पोहोचल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी व्यापाऱ्यांशी भेटीगाठी घेत मतदानाचे आवाहन केले. पुढे जयभवानी, हाऊसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, एस. टी. कॉलनी, स्वप्ननगरी, छत्रपतीनगर भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेला स्थानिक रहिवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळला.
न्यू गजानन कॉलनीत पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी परिसरातील नगरसेवक , काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आंबेडकरनगर, नारेगाव-ब्रिजवाडीत आज पदयात्रा
राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज वॉर्ड क्र. २० आंबेडकरनगर, २२ नारेगाव- ब्रिजवाडी, २३ मसनतपूर भागात काढण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता गौतमनगर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.