ठराव झाले, पण, कामांना गती नाही
By Admin | Updated: August 18, 2014 00:32 IST2014-08-18T00:01:08+5:302014-08-18T00:32:50+5:30
परभणी : शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव घेतले जातात. परंतु, या ठरावांची अंमलबजावणी होत नाही.

ठराव झाले, पण, कामांना गती नाही
परभणी : शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव घेतले जातात. परंतु, या ठरावांची अंमलबजावणी होत नाही. परिणामी परभणी महापालिकेला नुकसान सहन करावे लागत आहे.
शहराच्या विकासाच्या संदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव घेण्यात येतात. सभेमध्ये हे ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. परंतु, या ठरावाची अंमलबजावणी धिम्या गतीने होत असल्याचे मागील काही महिन्यांपासून दिसत आहे. परभणी शहर मनपाची निर्मिती झाल्यानंतर शहरामध्ये नव्याने रिव्हीजन घेण्याचा ठराव वर्षभरापूर्वीच झाला होता. १५ वर्षांपासून शहराचे रिव्हीजन झालेले नाही. नवीन घरांची आकारणी तसेच जुन्या घरांचे नवीन बांधकाम आदी बाबींचे रिव्हीजन होणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठरावही झाला होता. परंतु, या कामांना अजूनही गती मिळालेली नाही. त्याचप्रमाणे नळपट्टीची वसुली सक्तीने करावी, असा ठरावही झालेला आहे. शहरात अनाधिकृत नळ जोडणीधारकांची संख्या अधिक आहे. परंतु, या विरुद्ध कारवाई होत नाही. मालमत्ता, जमीनभाडे, नगररचना विभागामार्फत शिफारसीनुसार आकारण्याचा ठरावही मनपाने घेतलेला आहे. यातही गती नाही. तसेच शहरामध्ये असलेल्या मनपाच्या मालकीच्या कॉम्प्लेक्समध्ये भाडेवाढ करण्याचा ठराव झालेला असून तो ही लागू करण्यात आला नाही. नागरिकांना मनपातून दिले जाणारे प्रमाणपत्र आॅनलाईन द्यावेत, अशा पद्धतीचा ठराव झालेला आहे. परंतु, अजूनही याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परभणी नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी असलेले अनुदान बंद झालेले आहे. त्यामुळे मनपाला उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. विविध ठराव घेण्यात आले खरे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने एक प्रकारे मनपाचे आर्थिक नुकसानच होत आहे. (प्रतिनिधी)