मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा ठराव
By Admin | Updated: July 30, 2014 00:50 IST2014-07-30T00:15:37+5:302014-07-30T00:50:37+5:30
लातूर : धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी समाजातर्फे आंदोलन सुरु आहे़

मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा ठराव
लातूर : धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी समाजातर्फे आंदोलन सुरु आहे़ बारामतीतील आंदोलन मागे घेण्यात आले तरी लातुरात हा लढा अधिक तीव्र करण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या बैैठकीत घेण्यात आला़
धनगर समाजाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी लातुरात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची अॅड़ अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला़ बारामतीमधील आंदोलन जरी मागे घेण्यात आले तरी आता राज्यभर नव्याने आंदोलन सुरु करण्याचे सूतोवाच या बैठकीतून करण्यात आले़ त्याअंतर्गत रास्ता रोको, रेल रोको, बंद, निदर्शने अशा मार्गाने आंदोलने करण्यात येतील़ शिवाय, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू न देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला़ गेल्या ६५ वर्षांपासून असलेल्या धनगर समाजाच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे़ आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचे ठरविण्यात आले़
यावेळी श्रीरंग शेवाळे, कैलास होळकर, बाळासाहेब होळकर, मधुशंकर टिळे, अॅड़अनिरुद्ध येचाळे, संतोष होळे, प्रवीण येळे, विशाल देवकते, धनराज माने, राजपाल भंडे, श्रीमती भोकरे, सुभाष लवटे, अॅड़मंचकराव डोणे, अॅड़शिंदे, मनोज अभंगे, पांडुरंग लिंबाळकर, भाऊसाहेब हाके-पाटील, रामकिसन मदने, गोविंद बैकरे, बाबूराव कनाळे, नारायण राजुरे, अॅडक़ोळगावे, गंगाधर केराळे, नानासाहेब कस्पटे, मनोहर व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
हा पवारांचा डाव़़़
राष्ट्रवादीचे नेते मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला धनगर समाजाविरुद्ध भडकविण्यात येत आहे़ यामागे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचाच डाव असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला़