हगणदारीमुक्तीचा संकल्प
By Admin | Updated: December 21, 2014 00:17 IST2014-12-20T23:58:15+5:302014-12-21T00:17:10+5:30
औरंगाबाद : पाटोदा- गंगापूर नेहरी हगणदारीमुक्त झाले. अनेक पुरस्कार प्राप्त करीत ही ग्रामपंचायत एक आदर्श मॉडेल ठरली. परंतु आता आपणास बाहेर पडायलाच हवे.

हगणदारीमुक्तीचा संकल्प
औरंगाबाद : पाटोदा- गंगापूर नेहरी हगणदारीमुक्त झाले. अनेक पुरस्कार प्राप्त करीत ही ग्रामपंचायत एक आदर्श मॉडेल ठरली. परंतु आता आपणास बाहेर पडायलाच हवे. यापुढे आपले पाऊल गंगापूर तालुका पुढील वर्षभरात हगणदारीमुक्तीच्या दिशेने पडणार आहे, असा संकल्प पाटोदा- गंगापूर नेहरी आदर्श ग्रामपंचायतीचे शिल्पकार भास्कर पेरे पाटील यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनी शनिवारी सोडला.
गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त गंगापूर तालुक्यातील ग्रामसेवकांचा मेळावा त्यांनी पाटोदा येथे आयोजित केला होता. या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना पेरे म्हणाले, एक गाव आदर्श करून थांबावे काय, असा विचार मनात घोळत होता. परंतु त्यानंतर सर्व तालुक्यासाठीच काम करण्याचा निर्णय मी घेतला. यासाठी जवळपास दीडशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी, नागरिकांशी विचारविनिमय केला. हे कार्य सिद्धीस नेण्यात सर्वात महत्त्वाचा घटक हा ग्रामसेवक आहे. ग्रामसेवकाने मनावर घेतले तर तालुक्याचे चित्र सहज पालटू शकते. एक गाव हगणदारीमुक्त करताना किती अडचणी येतात, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे तालुका हगणदारीमुक्त करणे किती अवघड आहे, याची मला कल्पना असली तरी, अशक्य मात्र नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे.
यावेळी गंगापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती संजीव जैस्वाल, माजी जि. प. सदस्य अप्पासाहेब गावंडे, पं. स. सदस्य कृष्णा सुकासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक कदम, प्रा. प्रशांत पाटील अवसरमल, अॅड. आनंद खवले, गुरूदेव सेवा मंडळाचे अॅड. मनीष शर्मा, पाटोद्याचे सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मानकर आदींची उपस्थिती होती. ग्रामविकास अधिकारी आर. डी. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी एन. एम. वाघ यांनी आभार मानले.
पाण्याचे एटीएम ठरले आकर्षण
प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी, ग्रामसेवक आणि निवडक राजकीय कार्यकर्त्यांना या संकल्प मेळाव्यासाठी पाटोदा येथे निमंत्रित करण्यात आले होते. हा मेळावा संपल्यानंतर ग्रामसेवकांनी गावात फिरून पाहणी केली. बहुतांश सर्वांचीच पावले थबकली कै. बालचंद पाटील पेरे जलशुद्धीकरण केंद्रासमोर. ग्रामपंचायत पातळीवर सुरू झालेले हे तसे पहिलेच जलशुद्धीकरण केंद्र. या शुद्धीकरण केंद्रावरून नागरिकांना शुद्ध पाणी नेता येते. परंतु त्यासाठी पैसे मोजावे लागतात, तेही अॅडव्हान्समध्ये. ग्रामपंचायतीने त्यासाठी प्रीपेड कार्डची अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. १०० रुपये भरून ग्रामपंचायत ग्रामस्थांना एक एटीएमसारखे कार्ड देते. हे कार्ड मशीनमध्ये स्वॅप केले की, १० लिटरची एक कॅन भरून शुद्ध पाणी मिळते. कार्डचे पैसे संपले की, पाणी बंद होते. २० लिटर क्षमतेच्या ३५० बॉटल पाणी या केंद्रात दररोज शुद्ध होते. ५ रुपयांप्रमाणे ही बॉटल विक्री होते. त्यातून दररोज १७५० रुपयांची अमदानी ग्रामपंचायतीला होते.