राजीनाम्याचा ‘गुंता’ सुटणार
By Admin | Updated: November 8, 2016 01:26 IST2016-11-08T01:17:19+5:302016-11-08T01:26:20+5:30
औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

राजीनाम्याचा ‘गुंता’ सुटणार
औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन भाजपला आजपर्यंत देण्यात आले. सोमवारी घोसाळकर शहरात दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत युतीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. बैठकीत राजीनामाप्रकरणी चर्चा सुरू होती.
३१ आॅक्टोबर रोजी मनपातील दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. दिवाळीनंतर राजीनामा घेण्यात येणार असल्याचे आश्वासन सेनेने भाजपला दिले. दिवाळी संपताच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजीनाम्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला. ५ नोव्हेंबर रोजी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ५ नोव्हेंबरला घोसाळकर शहरात आलेच नाहीत.
सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी त्यांचे आगमन झाले. रात्री उशिरा शिवसेना-भाजप नेत्यांची बैठक सुरू होती. बैठकीस नेहमीप्रमाणे चंद्रकांत खैरे उशिरा आले. त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत राजीनामाप्रकरणी निर्णय होईल, असे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी १९ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेनंतर ते आपला राजीनामा आयुक्तांना सादर करणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. त्यापूर्वी उपमहापौर आपला राजीनामा महापौरांना सादर करतील.
४या प्रक्रियेनंतर नवीन महापौर, उपमहापौर निवडण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा अवधी लागणार आहे. अगोदरच भाजपला फक्त १२ महिन्यांसाठी महापौरपद देण्यात येत आहे. त्यातही एक महिन्याने हे पद दिल्यास भाजपच्या नगरसेवकाला ११ महिन्यांसाठीच पद मिळेल.