आरक्षित तिकीट रद्द करणे महागले
By Admin | Updated: June 12, 2017 00:31 IST2017-06-12T00:28:37+5:302017-06-12T00:31:11+5:30
औरंगाबाद : एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर आरक्षित तिकीट रद्द करण्याची पद्धती स्वीकारली आहे

आरक्षित तिकीट रद्द करणे महागले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर आरक्षित तिकीट रद्द करण्याची पद्धती स्वीकारली आहे. यापुढे बस सुटण्याच्या चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कपात होईल. आतापर्यंत चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास केवळ ५ ते १० रुपये कपात करून पूर्ण रक्कम परत केली जात होती. नव्या बदलामुळे आरक्षित तिकीट रद्द करणे चांगलेच महागले आहे.
आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या या नव्या बदलाची १० जूनपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. एसटी महामंडळातर्फे मागील अनेक वर्षे आरक्षित तिकीट रद्द केल्यावर परतावा दिला जातो; परंतु यामध्ये बदल करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. रेल्वे प्रशासनाचा कित्ता एसटी महामंडळाने गिरविल्याचे दिसते. त्यामुळे एसटी तिकीट आरक्षण केल्यानंतर ते रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे.
तिकीट दराबरोबर व्हॉल्वो बसच्या आरक्षणासाठी १०, एशियाड बसच्या आरक्षणासाठी ७, तर साध्या (लाल) बसच्या आरक्षणासाठी ५ रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. आतापर्यंत बस निघण्याच्या चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास केवळ आरक्षण शुल्क कपात के ले जात होते. त्यामुळे ऐनवेळी प्रवास रद्द केल्यानंतरही प्रवाशांचे कोणतेही नुकसान होत नव्हते.
गर्दीच्या कालावधीत एसटी बसला प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी अनेक जण जागेचे आरक्षण करतात; परंतु खाजगी वाहतूकदारांकडून कमी रकमेत तिकीट उपलब्ध झाल्यास ‘एसटी’चे तिकीट रद्द करण्याचे प्रकार होतात. त्यातून नुकसान होत असल्याने हा बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूचनेनुसार बदल
वरिष्ठ कार्यालयाकडून आरक्षित तिकीट रद्द करण्यासंदर्भातील बदलाची सूचना आली आहे. त्यानुसार बदल करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी दिली.