चार प्रभागांचे आरक्षण बदलले
By Admin | Updated: July 11, 2017 00:18 IST2017-07-11T00:17:32+5:302017-07-11T00:18:48+5:30
नांदेड: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी सोमवारी नव्याने सोडत काढण्यात आली़

चार प्रभागांचे आरक्षण बदलले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी सोमवारी नव्याने सोडत काढण्यात आली़ या सोडतीत चार प्रभागातील आरक्षण बदलले असून या बदललेल्या आरक्षणामुळे कही खुशी तर कही गम असे चित्र दिसून आले़
मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेने प्रारंभी ६ जुलै रोजी आरक्षण सोडत काढली होती़ त्या २० प्रभागातील ८१ नगरसेवकांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीत ४१ जागा महिलांसाठी तर ४० जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्या होत्या़ मात्र या आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागासप्रवर्गातील महिलांसाठीच्या आरक्षणात काही त्रुटी आढळल्याने राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनास आरक्षणाबाबत नव्याने सोडत काढण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार सोमवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली़ या फेरसोडतीत चार प्रभागातील आरक्षणात बदल झाला आहे़
हनुमानगड प्रभागात पूर्वीच्या आरक्षण सोडतीत क जागा ही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सुटली होती़ आता त्यात बदल होऊन ती जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच पण महिलांसाठी आरक्षित झाली आहे़ श्रावस्तीनगर प्रभागातही दोन बदल झाले असून त्यात ब जागा नामप्रसाठीची होती ती आता नामप्रच्या महिलांसाठी सुटली आहे़ तर क जागा ही सर्वसाधारण होती ती आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे़
चौफाळा प्रभागातही ब जागा नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी होती ती आता नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी सुटली आहे़ खडकपुरा प्रभागातील ब जागा नागरिकांचा मागासप्रवर्गातील महिलांसाठी होती ती आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राहणार आहे़ तर सर्वसाधारण असलेली क जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहणार आहे़
या फेरसोडतीचा मोठा फायदा विद्यमान महापौर शैलजा स्वामी यांना झाला आहे़ आरक्षणाच्या पहिल्या सोडतीत महापौर स्वामी यांना नामाप्र प्रवर्गातून संधी असली तरी फेरसोडतीत ती महिलांसाठीच होणार आहे़
महापौर शैलजा स्वामी यांचे पती किशोर स्वामी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले होते़ मात्र फेरआरक्षणाच्या सोडतीत ते आता हनुमानगड प्रभागातून तरी बाहेर झाले आहेत़ अन्य तीन प्रभागातील चित्रही फेरआरक्षणाच्या सोडतीनंतर बदलले आहे़ अनेक इच्छुकांचे चेहरे हिरमुसले आहेत तर काही इच्छुकांचे चेहरे मात्र फेरआरक्षणानंतर उजळले आहेत़
महापालिकेची ही निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे़ यापूर्वीची निवडणूकही प्रभाग पद्धतीने झाली असली तरी २ वॉर्डांचा एक प्रभाग होता़ आता होणारी आगामी निवडणुकीत मात्र चार वॉर्डांचा एक प्रभाग राहणार आहे़