२१ जुलै रोजी आरक्षण सोडत

By Admin | Updated: July 20, 2014 00:27 IST2014-07-20T00:09:39+5:302014-07-20T00:27:13+5:30

कंधार : आगामी पं़स़ सभापती पदाची आरक्षण सोडत २१ जुलै रोजी होणार आहे़ परंतु पं़स़ सदस्यांत कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़

Reservation dated July 21 | २१ जुलै रोजी आरक्षण सोडत

२१ जुलै रोजी आरक्षण सोडत

कंधार : आगामी पं़स़ सभापती पदाची आरक्षण सोडत २१ जुलै रोजी होणार आहे़ परंतु पं़स़ सदस्यांत कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षात कुरघोडीचे राजकारण होण्याचे संकेत आहेत़ त्यातच शेकापची भूमिका मात्र निर्णायक राहणार असेच एकंदरीत राजकीय चित्र आहे़
त्रिस्ततरीय पंचायतराज व्यवस्थेमुळे पंचायत समिती गठीत करण्यात आली़ सुरुवातीला सभापती, उपसभापती, पं़स़ सदस्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते़ कंधार पंचायत समितीचे सभापती म्हणून पहिला बहुमान सप्टेंबर १९६२ मध्ये विठ्ठलराव गणपतराव पवार यांना मिळाला़ त्यानंतर भाई गुरुनाथराव माणिकराव कुरुडे, प्रल्हाद केशटवार, शंकरराव जाधव, व्यंकटराव मुकदम, माधवराव पांडागळे यांनी सभापतीपद भूषविले़ १९९७ पासून आरक्षण लागू झाले़ त्यामुळे आरक्षणाचा पहिला सभापतीपदाचा मान भारतबाई व्यंकटराव गायकवाड यांना मिळाला़ त्यानंतर बापूराव गौंड, कालीदास गंगावरे, माणिक चोपवाड, बबीता कदम, रामचंद्र राठोड यांनी सभापतीपद भूषविले़
मार्च २०१२ मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सभापती पदाचे आरक्षण होते़ शह-काटशहाच्या राजकारणामुळे पंकजा केंद्रे यांना संधी मिळाली़
आपल्या कार्यकाळात त्यांनी पक्ष मजबुती व पक्षवाढीसाठी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी किती तत्परता दाखविली याचा लेखाजोखा पक्षाकडे असेल़
कोणत्या प्रवर्गाला आरक्षण मिहणार यावरून मोठे अंदाज व्यक्त केले जात आहेत़ परंतु सध्याची काँग्रेस-राकाँ व शेकाप आघाडी राहणार का, हासुद्धा महत्त्वाचा विषय आहे़ मागील वेळेस कोणतेही पद शेकापला मिळाले नाही़ त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाला आरक्षण सुटल्यास सुनिता कांबळे यांना संधी मिळण्याची आशा आहे़ तसेच अनु़जाती (पुरूष) आरक्षण राहिल्यास राक़ाँ़चे अम्रता कांबळे यांची दावेदारी राहील़ खुल्या पुरुष प्रवर्गातून बालाजी पांडागळेसुद्धा प्रमुख दावेदार राहतील़ सभापती-उपसभापती निवडीत शेकापने मागील वेळी निर्णायक भूमिका बजावली होती़आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शेकापचे अ‍ॅड़मुक्तेश्वरराव धोंडगे व जि़प़ सदस्य प्रा़डॉ़पुरुषोत्तम धोंडगे कोणती भूमिका घेतात, यावर बरेच अवलंबून आहे़ २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण पदाची सोडत होणार आहे़
त्यानंतर राजकीय पक्षात वेगाने चाचपणी करतील़ परंतु सभापती पदाला आगामी विधानसभा निवडणुकीचे संदर्भ मात्र ठळकपणे राहणार हे निश्चित आहे़ (वार्ताहर)
आरक्षण सोडतीवरुन राजकारण तापले
विद्यमान पं़स़ सभापती पंकजा केंद्रे या १४ मार्च २०१२ पासून पदभार सांभाळत आहेत़ २०१२ मध्ये काँग्रेस, राकाँ व शेकाप यांनी माजी आ़ प्रताप पा़ चिखलीकर यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी आघाडी केली होती़ त्यामुळे सभापती काँग्रेसचा व उपसभापती राकाँकडे देण्यात आले़ शेकापने राजकीय मन मोठे करत काँग्रेस, राकाँला साथ दिली़ पं़स़मध्ये चिखलीकर समर्थक-५, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस-२ व शेकाप-२ असे पक्षीय बलाबल आहे़ आरक्षण सोडतीवरून राजकारण आताच तापत आहे़

Web Title: Reservation dated July 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.