पुनर्वसू नक्षत्राकडे डोळे
By Admin | Updated: July 6, 2014 00:14 IST2014-07-06T00:09:46+5:302014-07-06T00:14:48+5:30
यशवंत परांडकर, नांदेड मृग व आर्द्रा नक्षत्रात पाऊस चांगला पडेल असे वाटले होते. पण हक्काच्या दोन्ही नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता पुनर्वसू नक्षत्राकडे लागले आहेत.
पुनर्वसू नक्षत्राकडे डोळे
यशवंत परांडकर, नांदेड
मृग व आर्द्रा नक्षत्रात पाऊस चांगला पडेल असे वाटले होते. पण हक्काच्या दोन्ही नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता पुनर्वसू नक्षत्राकडे लागले आहेत.
महागाईने कहर केला असला तरी कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी महागामोलाची बियाणे व खते शेतकऱ्यांनी विकत घेतली. दरवर्षी मृग व आर्द्रा नक्षत्रात चांगला पाऊस पडतो याची शेतकऱ्यांना आशा होती. पण शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली. मृग व आर्द्रा नक्षत्रात पाऊस पडला असता तर मूग पदरात पडले असते. पण शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच पडली आहे. हवामानशास्त्र प्रगत झाले असले तरी आजही बहुतांश शेतकरी नक्षत्रांवर भरवसा ठेवून आहेत. पाऊस पडावा म्हणून गावोगावी महाप्रसाद, काकडा आरती करत आहेत. एवढेच नाहीतर भल्या पहाटे उठून गंगेचे पाणी भोपळ्यात, तांब्याच्या तांब्यात भरुन त्या पाण्याने गावातील देवदेवतांना अंघोळ घालत आहेत. काही ठिकाणी तर देवघरातील देव पाण्यात ठेवत आहेत.
६ जुलै रोजी पुनर्वसू (तरणा पाऊस) रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी सुरु होऊन १९ जुलै रोजी संपणार आहे. या नक्षत्राचे वाहन ‘गाढव’ असून भरपूर पाऊस पडेल, असे जाणकार मंडळी भाकित करीत आहेत. पुनर्वसू नक्षत्राच्या पूर्वसंध्येला हलकासा पाऊस पडल्याने यापुढील नक्षत्रात जोरदार पाऊस पडेल, असे संकेत दिले जात आहेत.पावसाअभावी गत पंधरा दिवसांपासून भाजी-पाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. कांद्याने तर डोळ्यात पाणी आणले आहे. त्याचप्रमाणे फळांचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून केळी तीस ते चाळीस रुपये डझनप्रमाणे विकत असल्याचे श्रीनगर भागातील केळी विक्रेते संग्राम कांबळे यांनी सांगितले.