अभ्यासक म्हणतात, देशी तंत्रज्ञान विकसीत नसल्याने कृत्रिम पाऊस न परवडणारा

By Admin | Updated: August 5, 2015 00:34 IST2015-08-05T00:22:21+5:302015-08-05T00:34:11+5:30

लातूर : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात औरंगाबादमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे़ नाशिक जिल्ह्यातील

The researcher says, due to the lack of natural technology, artificial rain is not affordable | अभ्यासक म्हणतात, देशी तंत्रज्ञान विकसीत नसल्याने कृत्रिम पाऊस न परवडणारा

अभ्यासक म्हणतात, देशी तंत्रज्ञान विकसीत नसल्याने कृत्रिम पाऊस न परवडणारा

अभ्यासक म्हणतात, देशी तंत्रज्ञान विकसीत नसल्याने कृत्रिम पाऊस न परवडणारा
लातूर : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात औरंगाबादमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे़ नाशिक जिल्ह्यातील येवला येथील प्रयोग अयशस्वी झाला असला तरी औरंगाबादच्या प्रयोगाकडे मराठवाड्याचे लक्ष लागले असून, लातुरातही या पावसाची उत्सुकता आहे़ दरम्यान, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ नैसर्गिक पावसाच्या हलक्या सरी बरसल्याही़ त्यामुळे कृत्रिम पावसाचा हा तर प्रकार नाही ना, अशी चर्चाही लातुरात ऐकायला मिळाली़ कृत्रिम पाऊस प्रयोग म्हणून ठिक आहे़ परंतू व्यवहारीकदृष्ट्या परवडणारा नाही, असे मत पर्यावरण तज्ञ प्रा़डॉ़ सुरेश फुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़
नैसर्गिक पावसासाठी सध्याचे वातावरण अनुकुल आहे़ पश्चिम व दक्षिण भारतातून ढग मराठवाडा प्रदेशात जमा होत आहेत़ हेच वातावरण स्थिर राहिल्यास पाऊस पडेल, अशी आशा व्यक्त करत प्रा़डॉ़सुरेश फुले म्हणाले, संशोधन म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग ठिक आहे़ परंतु ज्या ठिकाणी हा पाऊस पाडला जातोय त्या ठिकाणी ढग किती आहेत, यावर ते अवलंबून आहे़ मिठाचे पाणी म्हणजेच सोडिअम क्लोराईडचा मारा ढगावर करुन तापमान कमी करुन कृत्रिम पाऊस पाडला जातो़ साधारणपणे २५ ते ३० किलोमिटर अंतराच्या परिघरात जेवढे ढग आहेत़ तेवढ्या परिसरातच हा पाऊस पडू शकतो़ त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची अपेक्षा करता येत नाही़ प्रयोग आणि संशोधन म्हणूनच याकडे पाहवे लागेल, नैसर्गिक पावसामार्फत जेवढे पाणी उपलब्ध होऊ शकते, तेवढे पाणी या प्रयोगातून उपलब्ध होऊ शकणार नाही़ व्यवहारीकदृष्ट्याही हा प्रयोग परवडणारा नाही़ दरम्यान, सध्या मराठवाड्यात पश्चिम व दक्षिण भारतातून ढग येत आहेत़ त्यामुळे नैसर्गिक पावसासाठीच सध्याचे वातावरण अनुकुल आहे़ वेदर चार्टवर ते स्पष्टपणे दिसत आहे़ आपला प्रदेश सपाट आहे़ नैसर्गिकरित्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे़ ढगांचे अच्छादन किती आहे, त्यावरही कृत्रिम पाऊस किती पडतो हे अवलंबून आहे़ सध्या वारा शांत झालेला आहे आणि ढगही येत आहेत़ त्यामुळे ही अनुकुल स्थिती कायम राहिली तर पुढील दोन दिवसांत पाऊस पडू शकतो, असेही प्रा़डॉ़ सुरेश फुले म्हणाले़
मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ आधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या़ त्यामुळे हा पाऊस नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे, अशी चर्चा लातूर शहरात होती़ औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात विमानाद्वारे ढगावर सोडियम क्लोराईड्स सोडून पाऊस पाडला जात असल्याची चर्चा होत असल्याने हा कृत्रिम पाऊस असेल, अशी चर्चा होती़ दरम्यान, निवासी जिल्हाधिकारी डॉ़ विश्वंभर गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नैसर्गिक रिमझिम पावसाच्या सरी आहेत़ आपल्याकडे या प्रयोगाचे अद्याप नियोजन नाही़ त्यामुळे आपल्याकडे सुरु असलेला पाऊस नैसर्गिक आहे़ (प्रतिनिधी)
पृथ्वीतलावरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते़ ही वाफ हलकी असल्याने वातावरणात उंच जाते़ त्याचे ढगामध्ये रुपांतर होते़ या ढगांना थंड हवा लागली की, वाफेचे रुपांतर पावसात होते़ ही पावसाची प्रक्रिया नैसर्गिक आहे़ कृत्रिम पावसाचा सगळा भर क्लाऊड सिडिंगवर असतो़ क्लाऊड सिडिंग म्हणजे ढगांची निर्मिती़ जमिनीपासून साधारणत: २ हजार ते १८ हजार उंची फूट पाऊस पडण्याची क्षमता असलेले ढग असतात़ उष्ण किंवा शीत या दोन पद्धतीने क्लाऊड सिडिंग केले जाते़ उष्ण पद्धतीमध्ये विमान किंवा रॉकेटच्या सहाय्याने ढगांवर सोडियम क्लोराईडचा फवारा सोडला जातो़ शीत पद्धतीत सिल्व्हर आयोडाइड आणि ड्राय आईस या रसायनांचा फवारा ढगांवर केला जातो़ इस्राईल, चीन, कॅनडा, रशिया, अफ्रिका आणि युरोपीयन देशांमध्ये असे प्रयोग केले जातात़ चीन येथे आॅल्मिपीकपूर्वी आणि रशियात देखील असा प्रयोग झाला होता़ अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार मोठा असतो़ तिथेही सोडियम आयोडायडचे कण फवारले की गारांची संख्या वाढते़ ढगांची निर्मिती बाष्पापासून झालेली असते़ आकाशातील ढगांचे तापमान शुन्य अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी असते़ पाऊस पडण्यासाठी ढगातील बाष्पांतील रुपांतर हिमकणांमध्ये व्हावे लागते़ कृत्रिम पावसाच्या प्रयोगात हीच क्रिया रसायनांच्या सहाय्याने घडवून आणली जाते़ मिठ फवारल्याने ढगामधील बाष्पांचे रुपांतर हीमकणांमध्ये होऊ लागते़

Web Title: The researcher says, due to the lack of natural technology, artificial rain is not affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.