मनपाच्या कंत्राटदारांना प्रजासत्ताक दिनाची भेट; १६ कोटींच्या बिलांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:10+5:302021-02-05T04:16:10+5:30
औरंगाबाद : थकीत बिलांसाठी महापालिकेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या कंत्राटदारांना प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी प्रजासत्ताक दिनाची भेट दिली. कंत्राटदारांना जवळपास ...

मनपाच्या कंत्राटदारांना प्रजासत्ताक दिनाची भेट; १६ कोटींच्या बिलांचे वाटप
औरंगाबाद : थकीत बिलांसाठी महापालिकेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या कंत्राटदारांना प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी प्रजासत्ताक दिनाची भेट दिली. कंत्राटदारांना जवळपास १६ कोटी रुपयांची बिले सोमवारी अदा करण्यात आली.
मागील दीड ते दोन वर्षांपासून ड्रेनेज, विद्युत, आदी वेगवेगळ्या विभागात काम केलेल्या कंत्राटदारांची बिले थांबवून ठेवण्यात आली होती. यापूर्वी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४० कोटी रुपयांची बिले अदा केली होती. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पाच कोटी रुपये देण्यात आले होते. रस्ते आणि अत्यावश्यक कामे केलेल्या कंत्राटदारांना ही बिले देण्यात आली होती. ड्रेनेज, विद्युत, पाणीपुरवठा या विभागांच्या कंत्राटदारांची बिले थकीत होती. थकीत बिलांसाठी दररोज कंत्राटदारांकडून पाठपुरावा करण्यात येत होता. प्रजासत्ताक दिनापूर्वी आर्थिक नियोजन करण्याचे आदेश पाण्डेय यांनी मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना दिले होते. मागील आठ ते दहा दिवसांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा आकडा किंचित वाढला आहे. योग्य आर्थिक नियोजन करून १५ ते १६ कोटी रुपयांची बिले काढता येतील, असा प्रस्ताव लेखाधिकारी पवार यांनी आयुक्तांकडे सादर केला. सोमवारी प्रशासक यांनी मान्यता दिल्यानंतर त्वरित बिलांचे वाटप सुरू करण्यात आले. मागील चार महिन्यांत मनपाकडून कंत्राटदारांचे ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मार्चअखेरपर्यंत आणखी नियोजन करून कंत्राटदारांची बिले देण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.