दुरुस्तीच्या निधीतून दालन सजविले !
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:52:45+5:302014-07-13T00:17:34+5:30
केज : पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागल्याने कौलारु बदलण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून सभापती आणि गटविकास अधिकारी यांचीच दालने पीओपी करुन सजविण्यात आली़

दुरुस्तीच्या निधीतून दालन सजविले !
केज : निजामकालीन, पुरातन आणि जुनाट झालेल्या पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागल्याने कौलारु बदलण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून सभापती आणि गटविकास अधिकारी यांचीच दालने पीओपी करुन सजविण्यात आली़ इमारत दुरुस्तीसाठी आलेला निधी हडप करण्याचा डाव टाकण्यात आला़ त्यामुळे इमारत दुरुस्तीसाठी आलेल्या निधीतून इमारतीचीच दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे़
पंचायत समिती कार्यालयाची इमारत निजामकालीन आहे़ पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीला गळती लागते़ त्यामुळे या इमारतीवरील कैलार बदलण्यासाठी व इमारत दुरूस्तीसाठी सन २०१२-१३ मध्ये अ-प्रशासन या लेखा शिर्षाअंतर्गत ७ लाख ५० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ परंतु पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सभापती यांच्या दालनाला पी़ओ़पी़ करून इमारत दुरूस्ती करण्याऐवजी हा निधी यातच खर्ची केल्याचे भासवून तो हडप करण्याचा डाव आखण्यात आला असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्ता धस यांनी केला आहे़
इमारत दुरूस्तीसाठी आलेल्या निधीतून इमारतीची दुरूस्तीच झाली पाहिजे, नसता पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशाराही धस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़
इमारत दुरुस्तीसाठीच निधी
पंचायत समिती केज इमारतीच्या दुरुस्तीसाठी ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ पंचायत समिती सभागृहाची मान्यता घेऊन हा निधी खर्च करण्यात आला पाहिजे, असे जि़ प़ सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस़ डी़ भारती यांनी सांगितले़
दोन दिवसांत पत्रे बदलणार
या प्रकरणी गटविकास अधिकारी आऱ डी़ गर्जे म्हणाले की, या कामाला मान्यता मिळाली आहे़ दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष पत्रे बदलण्याच्या कामाला सुरुवात करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल़ (वार्ताहर)
५७ कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत
पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते़ त्यामुळे गेल्या वर्षी कौलारुच्या इमारतीवरुन प्लास्टिकचा कागद टाकला होता़
परंतु यावर्षी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ५७ कर्मचारी पावसाळ्यात गळती लागल्यामुळे आपापला जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ या इमारतीची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी कर्मचारी वर्गामधून होत आहे़