‘रोहयो’चा अहवाल गुलदस्त्यात

By Admin | Updated: July 12, 2016 00:58 IST2016-07-12T00:45:16+5:302016-07-12T00:58:36+5:30

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यातील अनेक कामांवर बोगस मजूर लावून त्यांच्या नावावरील मलिदा लाटण्याचे काम स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Report of 'Roho' in Guddastava | ‘रोहयो’चा अहवाल गुलदस्त्यात

‘रोहयो’चा अहवाल गुलदस्त्यात


लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यातील अनेक कामांवर बोगस मजूर लावून त्यांच्या नावावरील मलिदा लाटण्याचे काम स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. काही ठिकाणी बोगस मजूर तर काही ठिकाणी मजूर न लावता यंत्राद्वारे काम करून पैसे उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित करताच चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. परंतु, या चौकशी समितीचा अहवालच अद्याप जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही.
रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यातील वाघोली, खुंटेगाव, सेलू, भादा, आशिव, उंबडगा, उंबडगा (बु.), उंबडगा (खु.) या गावांतील रस्त्यांच्या कामावर बोगस मजूर लावून त्यांच्या नावावरील मलिदा लाटण्याचे काम स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. यामध्ये गुत्तेदारासह काही अधिकारीही गुंतले असल्याने या बोगस कामातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी दोनवेळा डेड्लाईन देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला नाही. दरम्यानच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी १२० रस्त्यांची तपासणी पूर्ण झाली असून, उर्वरित कामांसाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या या अहवालासाठी आणखी किती दिवस लागणार, याबद्दल या भागातील नागरिकांतून तर्कवितर्क लावले जात आहेत. (प्रतिनिधी)
रोहयो कामात औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मजूर आढळून आल्याचे पथकाच्या तपासणीत उघड झाले आहे. यातील बहुतांश कामांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित कामांची तपासणीही या आठवड्यात पूर्ण होईल. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बोगस मजूर लावल्या प्रकरणी नियुक्त केलेल्या समितीत उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मुख्य अभियंता भंडे, तत्कालीन गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, औशाचे तत्कालीन गटविकास अधिकारी या पाच जणांचा समावेश आहे.
या समितीकडून १० जानेवारी २०१६ ला सादर होणार होता. परंतु, समितीकडे चौकशीसाठी अधिक काम सोपविण्यात आले. १० जुलै रोजी समितीकडून अहवाल येणार असल्याचे जाहीर झाले. परंतु, त्यावेळेसही अहवाल सादर झाला नाही. आता पुढील आठवड्यात चौकशी समितीचा अहवाल सादर होईल, असे समिती प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Report of 'Roho' in Guddastava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.