किरायादार कळवा अन्यथा फौजदारी
By Admin | Updated: August 31, 2014 01:11 IST2014-08-31T00:36:03+5:302014-08-31T01:11:40+5:30
शिरीष शिंदे , बीड गणेशोत्सव, नवरात्रोत्वस, बकरी ईद व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील घरमालक

किरायादार कळवा अन्यथा फौजदारी
शिरीष शिंदे , बीड
गणेशोत्सव, नवरात्रोत्वस, बकरी ईद व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील घरमालक, लॉज मालक व धर्मदाय संस्था यांनी आपल्याकडे वास्तव्यास किंवा राहणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र, त्याच्या निवासाचा पत्ता आदी संबंधित माहिती ठाण्याला कळविणे बंधनकारक असल्याची माहिती अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली़
अल्पकाळासाठी वास्तव्यास येऊन काही व्यक्तींनी घातपाताच्या कारवाया केल्याचे मुंबई, पुणे शहरात यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. असे प्रकार जिल्ह्यात घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही दिल्या आहेत. दरम्यान, घातपात करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील व्यक्ती अल्प काळासाठी वास्तव्यास येतात. असे कृत्य करून ते फरार होतात. असे यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी फौजदार प्रक्रिया संहिता सन-१९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये बीड जिल्ह्यातील हद्दतील सर्वांसाठी लागु केला आहे. जिल्हाधिकारी राम यांनी अधीक्षक रेड्डी यांना पत्रान्वये कळविले आहे.
आक्षेपार्ह गाणी/ संगीत
वाजविल्यास होणार कारवाई
सणासुदीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. काही गाण्यांमुळे इतर समाजातील लोकांची मने दुखावली जाऊन गैरप्रकार घडू शकतात. त्यामुळे आक्षेपार्ह गाणी अथवा संगीत वाजविणाऱ्यांवर कारवाई होईल़
पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढला ताण
सण-उत्सवामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात कामात आणखी वाढ होत चालली असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण वाढतच चालला आहे. मात्र सुरक्षतेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांना सर्तकच रहावे लागणार आहे यात दुमत नाही.