दीडशे वर्षांपूर्वीच्या जनगणनेचा अहवाल विद्यापीठात
By Admin | Updated: August 22, 2014 00:18 IST2014-08-22T00:17:39+5:302014-08-22T00:18:29+5:30
औरंगाबाद : निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर यांनी आपले संपूर्ण ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिले

दीडशे वर्षांपूर्वीच्या जनगणनेचा अहवाल विद्यापीठात
औरंगाबाद : निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर यांनी आपले संपूर्ण ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिले असून, यामध्ये सन १६५० ते १८०० पर्यंत प्रकाशित झालेल्या ४ हजार दुर्मिळ ग्रंथसंपदेचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाने आजपासून दोन दिवस ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राजे शामराज रायबहाद्दूर यांनी भेट दिलेले सर्व दुर्मिळ ग्रंथ व अन्य ग्रंथसंपदा वेगवेगळ्या दालनांमध्ये मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनास विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते झाले.
विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी प्रदर्शनातील ग्रंथसंपदेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी. वेरूळजवळील राजेराय टाकळी येथे आजही त्यांचे ऐतिहासिक घर आहे. त्यांना लिहिणे व वाचण्याची जिज्ञासा होती. त्यांनी आपले स्वतंत्र ग्रंथालय उभारले
होते.
आपल्या गावच्या परिसरात सुरू झालेल्या या विद्यापीठावर त्यांची फार श्रद्धा होती. १९६० मध्ये त्यांनी स्वत:ची संपूर्ण ग्रंथसंपदा, ग्रंथालयातील फर्निचर हे विद्यापीठाला भेट दिले. ४००० दुर्मिळ ग्रंथांचा तो ठेवा आजही विद्यापीठाच्या ग्रंथालयाने जिवापाड जतन करून ठेवला आहे. यामध्ये राजे शामराज रायबहाद्दूर यांच्या हस्तलिखितांचे २१४ खंड, छोट्याशा डबीत मावेल अशी भगवद् गीता, महाभारत, दीडशे वर्षांपूर्वीचा जनगणनेचे अहवाल (पुस्तक), १८३७ सालचे अजिंठा लेणीवरील जॉन ग्रिटीक लिखित ग्रंथाचा समावेश आहे.