कनगरा मारहाण प्रकरणी अहवाल द्या

By Admin | Updated: July 8, 2014 01:05 IST2014-07-08T00:49:43+5:302014-07-08T01:05:53+5:30

औरंगाबाद : कनगरा (ता. जि. उस्मानाबाद) येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास गावकऱ्यांनी पकडून दिल्यानंतर त्याला सोडून उलट गावकऱ्यांनाच अमानुष मारहाण केले

Report the case of Kangaroo Strike | कनगरा मारहाण प्रकरणी अहवाल द्या

कनगरा मारहाण प्रकरणी अहवाल द्या

औरंगाबाद : कनगरा (ता. जि. उस्मानाबाद) येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास गावकऱ्यांनी पकडून दिल्यानंतर त्याला सोडून उलट गावकऱ्यांनाच अमानुष मारहाण केल्या प्रकरणाचा चौकशी अहवाल ९ जुलैपर्यंत औरंगाबाद खंडपीठात सादर करा, असे निर्देश न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी दिले.
कनगरा येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीप्रकरणी गावकऱ्यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी एका दारू विक्रेत्यास पकडून पोलिसांना फोन करून बोलावून घेतले होते. त्यावेळी तीन पोलीस शिपायांनी गावकऱ्यांसमोर पकडलेला दारू साठा सांडून दिला आणि आरोपीला फरार होण्यास मदत केली. त्यावेळी संतप्त गावकऱ्यानी त्यांना जाब विचारताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन गावात आणखी कुमक मागवून घेतली.
रात्री उशिरापर्यंत गावातील प्रत्येक घरात घुसून त्यांनी महिला आणि पुरुषांना मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेत विनाउपचार ठाण्यात नेऊन ठेवले होते. याप्रकरणी प्रसारमाध्यमातून पोलिसांच्या दंडेलशाहीबाबत वृत्त येताच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कनगऱ्याला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षकांना दिले. दरम्यान, अभिमन्यू रावण इंगळे याच्या वतीने अ‍ॅड. विवेकानंद इंगळे यांनी याप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती केली. याचिका ४ जुलै रोजी सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने गृहविभागाला सदरप्रकरणी सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या याचिकेची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. या याचिकेत सरकार पक्षातर्फे सहायक लोकअभियोक्ता जी. के. नाईक-थिगळे हे काम पाहत आहेत.
काय घडले होते ?
अवैधरीत्या दारू विक्रीच्या कारणावरून कनगरा २६ मे रोजी पोलिस -ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी तेथे पोहोंचलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या गाडीवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाला समजल्यानंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी सुमारे शंभरपेक्षा अधिक पोलिसांच्या फौजफाट्यासह कनगऱ्यात जाऊन रात्री एक ते पहाटे चार या वेळेत ग्रामस्थांना घरात घुसून बेदम मारहाण केली. अनेकांचे दरवाजे तोडून पोलिस घरात घुसले होते.
या मारहाणीत पन्नासहून अधिक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी केलेल्या या निर्दयी मारहाणीचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभरात उमटले. यावर पोलिस प्रशासनाने सहाय्यक पो. निरीक्षकांसह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना प्राथमिक चौकशी आधारे तातडीन निलंबित केले. या प्रकरणाची राज्याच्या गृह विभागानेही गंभीर दखल घेतली. गृहमंत्री आर. आर. पाटील स्वत: कनगऱ्यात आले.
घटनेची पाहणी केल्यानंतर हा प्रकार शासनाच्या सहनशीलते पलिकडचा असल्याचे सांगत या प्रकरणी पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांविरूध्द आठवडाभरात प्रशासकीय कारवाई होईल. तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येतील, अशी जाहीर ग्वाही त्यांनी दिली होती.
तसेच या प्रकरणी ग्रामस्थांची जाहीर माफीही गृहमंत्र्यांनी मागितली होती. मात्र, महिना उलटून गेला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई झालेली नाही.

Web Title: Report the case of Kangaroo Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.