किन्होळा येथे पुलाची श्रमदानातून दुरूस्ती
By Admin | Updated: September 11, 2014 00:00 IST2014-09-10T23:54:44+5:302014-09-11T00:00:56+5:30
वसमत : तालुक्यातील किन्होळा नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला होता. पुलाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेवटी किन्होळा ग्रामस्थ मैदानात उतरले आहेत.

किन्होळा येथे पुलाची श्रमदानातून दुरूस्ती
वसमत : तालुक्यातील किन्होळा नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला होता. पुलाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेवटी किन्होळा ग्रामस्थ मैदानात उतरले आहेत. श्रमदानातून तात्पुरता रस्ता करण्याचे काम ग्रामस्थांनी बुधवारपासून सुरू केले.
किन्होळा हे राज्य रस्त्यालगतचे गाव आहे. या गावाला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्या रस्त्यावर असलेल्या नदीवर बांधण्यात आलेला पूल अत्यंत चुकीचा व सुमार दर्जाचा झालेला आहे. पूल जमीन लेवलला असल्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी पुलावरून जाते व ग्रामस्थांचा संपर्क तुटतो. या पुलावरून गतवर्षी दोन ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. पुलाच्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी, निवेदने दिलेली आहेत. मात्र आजवर या पुलाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. यावर्षीच्या पहिल्याच जोरदार पावसात नदीला पूर आला व पूल वाहून गेला. त्यामुळे ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.या पुलाची दुरूस्ती व पर्यायी व्यवस्था जलदगतीने होईल, अशी अपेक्षा होती; परंतु अद्याप काम सुरू न झाल्याने अखेर श्रमदानातून पुलाच्या दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. बुधवारी श्रमदानासाठी पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलले आहे. अॅड. शिवाजी जाधव मित्रमंडळाचे सदस्य, सरपंच, ग्रा.पं. सदस्य, गावातील तरूण, ग्रामस्थ व पदाधिकारी श्रमदानासाठी उतरले आहेत. तात्पुरती व्यवस्था या श्रमदानातून करण्यात येणार आहे. श्रमदानाच्या कामासाठी सरपंच बालाजीराव जाधव, व्यंकटराव जाधव, चेअरमन बालाजी जाधव, छत्रपती जाधव, श्रीकृष्ण लगारे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)