महाराष्ट्रासाठी उच्चशिक्षणाची नवसंजीवनी देणार

By Admin | Updated: April 30, 2015 00:36 IST2015-04-30T00:25:13+5:302015-04-30T00:36:56+5:30

पंकज जैस्वाल , लातूर देशपातळीवर आरोग्याचे धोरण ठरविण्याचे काम भारतीय आयुर्विज्ञान परिषद करीत असते़ महाराष्ट्रात सामाजीकदृष्ट्या आरोग्याबाबतच्या जाणीवा प्रगल्भ करुन

Renewing Higher Education for Maharashtra | महाराष्ट्रासाठी उच्चशिक्षणाची नवसंजीवनी देणार

महाराष्ट्रासाठी उच्चशिक्षणाची नवसंजीवनी देणार


पंकज जैस्वाल , लातूर
देशपातळीवर आरोग्याचे धोरण ठरविण्याचे काम भारतीय आयुर्विज्ञान परिषद करीत असते़ महाराष्ट्रात सामाजीकदृष्ट्या आरोग्याबाबतच्या जाणीवा प्रगल्भ करुन वैद्यकीय उच्चशिक्षणाच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याची नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत एमसीआयचे नवनिर्वाचीत सदस्य डॉ़गिरीश मैंदरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
रुग्णांच्या सेवेसाठी पदव्यूत्तर वैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे़ त्यामुळे डॉक्टर्स व उच्चशिक्षीत डॉक्टर्सची संख्या वाढविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील़ तसेच वैद्यकीय गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सीपीएसद्वारे येत्या आॅगस्टपासून मोफत पदव्युत्तर शिक्षण देण्यात येणार असल्याचे डॉ़ गिरीश मैंदरकर यांनी सांगितले़ तसेच उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी सर्वांना उपलब्ध करुन देण्याबाबत आपला प्रयत्न राहील़
वैद्यकीय शिक्षणामध्ये वैद्यकशास्त्रासंबंधी सर्व अभ्यासक्रम शिकविला जातो़ परंतु आरोग्य निरोगी राहण्याबाबत शिकविले जात नाही़ त्यादृष्टीने एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात निरोगी शिक्षणाचा समावेश करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले़ अमेरिकेत १५० रुग्णांमागे १ डॉक्टर असतो़ भारतात १६००० जनतेच्या सेवेत १ डॉक्टर असतो़ भारतात एमसीआयमार्फत काम करण्यासाठी ‘स्काय इज द लिमिट’ असे येथील कामाचे स्वरुप असून या कामाच्या गतीला राजाश्रय मिळण्याची खरी गरज आहे़ वैद्यकीय महाविद्यालयांची मोठी संख्या असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रात डॉक्टर्स तुलनेने अधिक आहेत़ मध्यप्रदेशात आता कुठे वैद्यकीय शिक्षणाला गती येत आहे़ उत्तरप्रदेश याबाबत मागासलेले राज्य आहे़ तेथे वैद्यकीय शिक्षणाच्या कोणत्याही सोयी नाहीत़ गुजरात, त्रिपूरा येथे वैद्यकीय आणि उच्चशिक्षण देण्याबाबत हालचाली गतीमान आहेत, असेही ते म्हणाले़डॉक्टर रुग्णांना सेवा देतात, त्यांना बरे करण्यासाठी जीवाची पराकाष्टा करतात़ प्रयत्न करूनही काहीवेळा रुग्ण दगावतात़ त्यामुळे डॉक्टर, रुग्ण नातेवाईकांत वाद होतो. हे वाद टाळण्यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकात सुसंवाद होणे गरजेचे आहे़ एखाद्या छोट्याश्या चुकीबद्दल मोठी शिक्षा नसावी यासाठी कायद्यात शिथीलता आणण्याची गरज आहे़ डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात आपण कायद्यांत सुधारणेचे प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले़ डॉ़गिरीष मैंदरकर यांचे वडील डॉक़मलाकर घन:श्याम उर्फ के़जी़मैंदरकर हे त्या काळचे एमबीबीएस पदवीधऱ मुळचे उस्मानाबाद येथील डॉक़े़जी़मैंदरकर औसा येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले़ औसा येथील गावकऱ्यांच्या आग्रहामुळे खाजगी प्रॅक्टीस सुरु केली़ औसा या गावाने डॉक़े़जी़मैंदरकर यांना भरभरून प्रेम दिले़ त्यांचाच वारसा त्यांची दोन्ही मुले डॉ़शिरीष व डॉ़गिरीश मैंदरकर चालवित आहेत़ वडीलांनी दिलेली वैद्यकीय शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे़ वडीलांनी दिलेल्या संस्काराचा अभिमान असल्याचे डॉ़गिरीश मैंदरकर यांनी सांगीतले़
लातूरचे भूमिपूत्र विलासराव देशमुख यांनी लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याने आपणाला असोशिएट प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ आणि त्यामुळेच सीपीएस संस्थेवर निवडणुकीतून अध्यक्षपदावर संधी मिळाली़ विलासरावांमुळेच मला अनेक ठिकाणी संधी मिळाली, असेही डॉ़गिरिश मैंदरकर म्हणाले़ फेब्रुवारी महिन्यात कॉलेज आॅफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जन (सीपीएस) च्या वार्षिक पदवीदान समारंभासाठी येण्याचे विलासरावांनी अभिवचन दिले होते़ परंतु त्यापूर्वीच त्यांचे निघून जाणे सर्वांना धक्कादायक राहिले़ विलासरावांच्या वेळोवेळी झालेल्या भेटीतून वैद्यकीय शिक्षणाची त्यांची ओढ सांगत डॉ़गिरीश मैंदरकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला़
लातूरसाठी काय करणार असा प्रश्न विचारला असता डॉ़गिरीश मैंदरकर म्हणाले, ड्रग ट्रायल प्रयोगशाळा उभारण्याचा मानस व्यक्त केला़ अशा संस्था दिल्ली व अन्य ठिकाणी आहेत़ अशा स्वरुपाची संस्था लातूरला सुरु झाल्यास औषधी वापराबाबत आणि मार्केटमधील नवीन औषधांबाबत योग्य खात्री करता येवू शकेल़ तसेच ड्रग-ट्रायल समितीच्या माध्यमातून औषधींबाबत योग्य दिशा ठरविता येईल, असेही ते म्हणाले़

Web Title: Renewing Higher Education for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.