१५ हजारांच्या कर्जमुक्तीसाठी करावे लागणार नूतनीकरण
By Admin | Updated: July 12, 2017 00:33 IST2017-07-12T00:28:11+5:302017-07-12T00:33:30+5:30
बीड : बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या चालू खातेदारांना कर्जमाफीपोटी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या कर्जाचे नुतणीकरण करणे आवश्यक आहे.

१५ हजारांच्या कर्जमुक्तीसाठी करावे लागणार नूतनीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या चालू खातेदारांना कर्जमाफीपोटी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या कर्जाचे नुतणीकरण करणे आवश्यक आहे. तरच बँकेच्या चालू कर्जदारांना अनुदानाचा लाभ मिळणार असून १५ हजारांच्या आतील कर्जदाराचे कर्ज खाते या अनुदानामुळे कर्जमुक्त होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना २००९ ते २०१६ या कालावधीतील थकित कर्ज माफ करण्याचा निर्णय घेताना च चालू कर्जदारांसाठी अनुदान देण्याची योजना घोषित केली. यानुसार कर्जदारांना किमान १५ हजार ते कमाल २५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यासंदर्भात आदित्य सारडा म्हणाले की, बँकेचे चालू कर्जदार सभासद १ लाख १७ हजार आहेत. कर्जाची एकूण रक्कम ३८५ कोटी इतकी आहे. १५ हजार रुपयांच्या आतील कर्जाची रक्कम असणारे कर्जदार सभासद ३२ हजार ९४६ असून त्यांच्या कर्जाची रक्कम ३८ कोटी १७ लाख इतकी आहे. या कर्जदारांनी जर त्यांच्या चालू कर्जाचे नूतनीकरण केले तर त्यांना शासनाच्या १५ हजार रुपये अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे व ते सभासद कर्जमुक्त होतील. यासाठी ३१ जुलै १७ ही शेवटची मुदत तारीख आहे. नूतनीकरण केले नाही तर ते थकित कर्जदार वर्गवारीत जातील, असे सारडा यांनी सांगितले. कर्जमाफीच्या आणि अनुदानाच्या संदर्भाने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असल्याचे सांगत सारडा म्हणाले की चालू कर्जदार सभासदांच्या मनात अनुदानाविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. थकित कर्ज पुन्हा माफ होईल, अशी पसरत असलेली अफवा हा गैरसमज आहे.