कोट्यवधी किमतीच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:03 IST2021-05-28T04:03:27+5:302021-05-28T04:03:27+5:30
औरंगाबाद : शहागंज येथे गांधी पुतळ्याच्या पाठीमागे सीटीएस क्रमांक ७६६५ मधील भूखंडावर काही नागरिकांनी लोखंडी पत्रे टाकून ताबा घेण्यासाठी ...

कोट्यवधी किमतीच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले
औरंगाबाद : शहागंज येथे गांधी पुतळ्याच्या पाठीमागे सीटीएस क्रमांक ७६६५ मधील भूखंडावर काही नागरिकांनी लोखंडी पत्रे टाकून ताबा घेण्यासाठी केलेला प्रयत्न महापालिकेने हाणून पाडला. मनपाच्या मालकीचा तो भूखंड असून, बाजार मूल्यानुसार या भूखंडाची किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे. अतिक्रमण विभागाने माहिती मिळताच भूखंडावरील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर मालमत्ता विभागाकडून त्वरित ताबा घेण्यात आला. कब्जा करणाऱ्यांनी पथकासोबत वाद घातला. परंतु भूखंड महापालिकेच्या मालकीचा असून पीआर कार्डवर पालिकेचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेने १९५० मध्ये लाल मोहम्मद फते मोहमद कुरेशी यांच्याकडून हा भूखंड घेतला होता. मागील ७० वर्षांपासून या भूखंडाच्या पीआर कार्डवर महापालिकेचे नाव आहे. १५०० ते १८०० चौरस फूट हा भूखंड आहे. महापालिकेने ताब्यात घेतलेल्या या भूखंडाच्या शेजारीच जागेवर काही वर्षांपूर्वी शाळा सुद्धा बांधलेली आहे. गुरुवारी अचानक या भूखंडावर नारायण सिंग किशन सिंग (मयत) यांचे वारस बलवंत सिंग नारायण सिंग यांनी व मोहम्मद वाजीद मोहम्मद याकूब व इतर पाच जणांनी मिळून लोखंडी पत्रे लावण्याचे काम सुरू केले. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना ही माहिती मिळताच त्यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त अपर्णा थेटे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद आदी कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण भुईसपाट केले.