बंदोबस्त नसल्याने लांबली अतिक्रमण हटाव मोहीम
By Admin | Updated: July 4, 2017 23:41 IST2017-07-04T23:38:51+5:302017-07-04T23:41:28+5:30
हिंगोली : शहरातील विविध भागांत करण्यात आलेले अतिक्रमण पालिकेतर्फे मंगळवारी हटविण्यात येणार असल्याचे चार दिवसांपूर्वीच आवाहन केले होते.

बंदोबस्त नसल्याने लांबली अतिक्रमण हटाव मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील विविध भागांत करण्यात आलेले अतिक्रमण पालिकेतर्फे मंगळवारी हटविण्यात येणार असल्याचे चार दिवसांपूर्वीच आवाहन केले होते. परंतु आषाढी एकादशीनिमित्त नर्सी नामदेव येथे पोलीस बंदोबस्त असल्याने, अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे मोहीम पुढे ढकलली आहे.
शहरातील अतिक्रमणे तीन महिन्यांपूर्वी हटविली होती. ही मोहीम थंडावताच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेने अतिक्रमण हटविण्याचे सोमवारी नियोजन केले होते. परंतु पोलीस प्रशासनातर्फे मंगळवार निश्चित करण्याचे सांगितले. त्यावरुन मंगळवारी अतिक्रमण हटविण्याचे पूर्ण नियोजन केले होते. मात्र आषाढी एकादशीनिमित्त नर्सी नामदेव येथे पोलीस बंदोबस्त लागणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सोमवारी रात्री उशिरा कळाल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मोहीम दोन दिवसांनी पुढे ढकलली. त्यामुळे अतिक्रणधारकांना अजून दोन दिवसांचा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी लाऊडस्पीकरने आवाहन केल्यामुळे बहुतांश अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र आषाढी एकादशीनिमित्त पोलीस बंदोबस्तच नसल्याची कुणकुण लागल्याने काही जणांनी दोन दिवसांसाठी का होईना निश्वास टाकला.