माझे आजोळ असलेल्या लातूरची गैरसोय दूर करणार : भगवंत खुब्बा
By Admin | Updated: May 8, 2017 23:34 IST2017-05-08T23:33:02+5:302017-05-08T23:34:13+5:30
लातूरकरांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण अस्मितेचा प्रश्न करून बीदरला रेल्वे न्यायला लातूरकरांनी विरोध करू नये, असे भावनिक आवाहन बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी केले.

माझे आजोळ असलेल्या लातूरची गैरसोय दूर करणार : भगवंत खुब्बा
लातूरकरांना माझा जय महाराष्ट्र. माझे जन्मगाव बीदर असले, तरी लातूर माझे आजोळ आहे. लातूरशी माझेच नव्हे संपूर्ण बीदरकरांचे जुने संबंध आहेत. बीदरकर दवाखान्यासाठी लातूर जिल्ह्यात येतात. बाजार समितीसाठी लातूर जिल्ह्यात येतात. रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात येतात, इतकेच नव्हे तर आमची सोयरिक लातूरशी आहे. लातूरची रेल्वे मी पळविली नाही, तर रोटीबेटीचे संबंध असलेल्या बीदरशी लातूर रेल्वे जोडली आहे. गर्दी असेल, तर लातूरकरांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण अस्मितेचा प्रश्न करून बीदरला रेल्वे न्यायला लातूरकरांनी विरोध करू नये, असे भावनिक आवाहन बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
लातूर रेल्वेसाठी लातूरकरांनी आयोजित केलेल्या रेल रोकोच्या पूर्वसंध्येला स्वत: लातूरमध्ये येऊन त्यांनी लातूरकरांना ही विनंती केली. पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, लातूर स्वातंत्र्यापूर्वी कधी काळी बीदर जिल्ह्याचा भाग होते. त्यामुळे आम्हाला लातूर कधीच परके वाटले नाही. हा जिल्हा माझ्यासाठी आजोळ आहे. त्याची गैरसोय मी कसे करेन. बीदरला लातूरशी जोडण्यासाठी माझी धडपड आहे. ती लातूरकरांनी समजून घ्यावी. लातूरच नव्हे, रोटीबेटीचे संबंध असलेल्या नांदेड जिल्ह्याशी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आम्ही संबंध प्रस्थापित करू इच्छितो. गुलबर्गा-लातूर ही नवीन रेल्वे आम्ही मंजूर करून घेतली. बीदर-अहमदपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून घेतला. कर्नाटकातील टेंडर निघाले. महाराष्ट्रातील निघेल. शिवाय, गुलबर्गा-लातूर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग आम्ही मंजूर करून घेतला. संबंधासाठी रस्त्याची, रेल्वेची कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, हे समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.