सामाजिक भान ठेवून कर्ज प्रकरणे निकाली काढा : अप्पर जिल्हाधिकारी
By Admin | Updated: March 18, 2017 00:02 IST2017-03-18T00:00:41+5:302017-03-18T00:02:23+5:30
लातूर : बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़

सामाजिक भान ठेवून कर्ज प्रकरणे निकाली काढा : अप्पर जिल्हाधिकारी
लातूर : बचत गटांसह विविध महामंडळांनी बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़ दरम्यान, बँकांनी सामाजिक व मानवतेचे भान ठेवून कर्जप्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांनी दिले़
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक शुक्रवारी झाली, या बैठकीत ते बोलत होते़ बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूण महाजन, नाबार्डचे प्रतिनिधी एस़बी़ पाचपिंडे, जिल्हा उपनिबंधक वांगे व विविध बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती़
शासनाने विविध महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील लोकांच्या उन्नतीसाठी योजना हाती घेतल्या आहेत, अशा योजनांकडे बँकांनी मानवतावाद दृष्टिकोन ठेवून बघितले पाहिजे़ महामंडळाकडून आलेल्या कर्जप्रकरणाचा त्वरित निकाल लावला पाहिजे़ २०१६-१७ मध्ये सामाजिक घटकांतर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले़ परंतु, उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही़ २४ मार्चपर्यंत उद्दिष्टपूर्ती करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांनी या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिले़