‘त्या’ सभा आजही जालनेकरांच्या स्मरणात
By Admin | Updated: October 9, 2014 00:36 IST2014-10-09T00:10:43+5:302014-10-09T00:36:33+5:30
संजय कुलकर्णी , जालना आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण देशाचे, राज्याचे लक्ष वेधणाऱ्या,

‘त्या’ सभा आजही जालनेकरांच्या स्मरणात
संजय कुलकर्णी , जालना
आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण देशाचे, राज्याचे लक्ष वेधणाऱ्या, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या विविध प्रमुख नेत्यांच्या निवडणूक प्रचार सभा जालनेकरांच्या आजही स्मरणात आहेत.
६३ वर्षांमध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या-त्या वेळी प्रमुख राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी सभेच्या निमित्ताने जालन्यात हजेरी लावली. पहिली मोठी सभा १९५१ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची झाली. पंडित नेहरुंच्या या सभेसाठी मराठवाड्यातून काँग्रेसजन जालन्यात दाखल झाले होते.
१९७८ मध्ये इंदिरा गांधी यांची सभा झाली. त्यावेळी त्या सत्तेबाहेर होत्या. मात्र त्यावेळी स्थापन झालेल्या इंदिरा काँग्रेसच्या ‘पंजा’ या निवडणूक चिन्हाची माहिती इंदिरा गांधी यांनी याच सभेतून लोकांना दिली. १९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत विराट जनसमुदाय पाहावयास मिळाला. विशेष म्हणजे या सभेच्या निमित्ताने ठाकरे यांचा जालन्यात मुक्काम होता. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची मोठी सभा झाली. या सभेत त्यांनी तरूणांची मने जिंकली होती. जनता पार्टीचे चंद्रशेखर, भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याही सभा जालन्यात झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची एक प्रचारसभा झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीही आपल्या वक्तृत्वाने नागरिकांची मने जिंकलेली आहेत. २००९ मध्ये सोनिया गांधी यांची मोठी सभा झाली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची विराट गर्दी. ही गर्दी पाहून स्वत:चे सुरक्षा कडे तोडून सोनियांनी काही महिलांकडून स्वागताची फुले स्वीकारली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, १७ एप्रिल २०१४ रोजी राहुल गांधी यांची सभा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात जालन्यातील सभेद्वारेच प्रचारदौरा सुरू केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभा जालन्यात झालेल्या आहेत. बसपाच्या नेत्या मायावती यांचीही सभा झालेली आहे.