कोरडा दिवस हिवताप रोखण्याचा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 23:25 IST2016-04-24T23:22:54+5:302016-04-24T23:25:33+5:30
हिंगोली : सध्या जिल्हाभरात पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र अल्प सांडपाण्यामुळेही डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.

कोरडा दिवस हिवताप रोखण्याचा उपाय
हिंगोली : सध्या जिल्हाभरात पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र अल्प सांडपाण्यामुळेही डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईच्या काळातही कोरडा दिवस पाळल्यास डासांमुळे होणारे आजार टाळता येणे शक्य होणार आहे.
हिवतापाचा प्रसार हा ‘अॅनाफिलिस’ डासांच्या मादीमार्फत होत असतो. या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून ठेवलेल्या पाण्यात होत असते. विशेष करुन भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे आदीमध्ये या डासांची उत्पत्ती होत असते. ‘अॅनाफिलिस’ डासांची मादी हिवताप झालेल्या रुग्णास चावल्यास रुग्णांच्या रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासांच्या पोटात जावून तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. तेव्हा निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये गेल्यानंतर तेथे त्यांची वाढ होऊन मनुष्यास दहा ते बारा दिवसांनी अचानक थंडी वाजण्यास सुरुवात होते. विविध गावातील जानेवारी महिन्यात १५ रक्तजल नमुने तपासणीस नांदेडच्या प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे व किटकशास्त्रीय तपासणीही केली. हिवताप कार्यालयाकडे धूर फवारणीची दहा यंत्रे उपलब्ध आहेत. हिवताप लक्षणे आढळल्यास प्राथमिक किंवा आरोग्य उपकेंद्रांच्या सल्यानुसार औषधी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
हिवताप, डेंग्यू- चिकुनगुनिया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यातील डासांपासून होतात. कोरडा दिवस पाळल्यास त्यांची उत्पत्ती रोखणे शक्य आहे. घाण पाण्यात ‘क्युलेक्स’ डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते. त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व नाल्या वाहत्या होतील, डबकी, खड्ड्यात पाणी साचून राहणार नाही. याची काळजी घेतली तर हिवताप डेंग्यु, चिकुनगुनिया, हत्तीरोग होण्याचे टाळता येणे शक्य आहे.
(प्रतिनिधी)