रेमडेसिविर जीवनरक्षक इंजेक्शन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:59+5:302021-05-05T04:07:59+5:30
औरंगाबाद : रेमडेसिविर हे जीवनरक्षक औषध नसून ते फक्त कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे कोरोनाबाधित ...

रेमडेसिविर जीवनरक्षक इंजेक्शन नाही
औरंगाबाद : रेमडेसिविर हे जीवनरक्षक औषध नसून ते फक्त कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत आग्रह धरु नये. तसेच गरज नसताना रुग्णांचे सिटी स्कॅन करू नका, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिल्या.
जिल्ह्यातील विविध डॉक्टरांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्ष येथे आयोजित कोरोना टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होेते.
रेमडेसिविर वापराबाबत जनतेचा अट्टाहास आणि काही गैरसमज आहेत. याला प्रतिबंध घालण्यासाठी वैद्यकीय व आरोग्य यंत्रणांनी राज्य टास्क फोर्सच्या समितीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रुग्णांना रेमडेसिविर निर्देशित करावे, असे ते म्हणाले.
बैठकीस मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपायुक्त जगदीश मणियार, डॉ.सुंदर कुलकर्णी, डॉ.ज्योती बजाज आदींची उपस्थिती होती.
गरज नसताना रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यात येऊ नये. रेमडेसिविरची अनधिकृत विक्री, औषधाचा साठा याबाबत संबंधित यंत्रणेने आपली जबाबदारी पार पाडावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संदिग्ध अहवाल आल्यास सिटी स्कॅन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अपवादात्मक परिस्थितीत संदिग्ध आला किंवा रुग्णांस कोरोनाची लक्षणे आहेत पण अहवाल निगेटिव्ह आला तर या परिस्थितीत निदानासाठी सिटी स्कॅन चाचणी उपयोगी पडते. तर कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भात उपचार वाढविण्याची गरज असल्याचे मत डॉ. निकाळजे यांनी व्यक्त केले.