योग्य तापमान राखण्यासाठी पोलिसाच्या घरातील फ्रीजमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:02 IST2021-04-30T04:02:27+5:302021-04-30T04:02:27+5:30
औरंगाबाद: गुन्हे शाखेने मंगळवारी कारवाई करून जप्त केलेले ५ रेमडेसिविर इंजेक्शन योग्य तापमानाअभावी वाया जाणार नाही, ...

योग्य तापमान राखण्यासाठी पोलिसाच्या घरातील फ्रीजमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन ठेवले
औरंगाबाद: गुन्हे शाखेने मंगळवारी कारवाई करून जप्त केलेले ५ रेमडेसिविर इंजेक्शन योग्य तापमानाअभावी वाया जाणार नाही, याची दक्षता घेत पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी ती पोलीस शिपायाच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवली. कोविड रुग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर करा, अशी विनंती करीत ते इंजेक्शन त्यांनी औषधी निरीक्षकांच्या स्वाधीन केले.
तुटवडा झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णाचे नातेवाईक भटकंती करीत आहेत. याचा गैरफायदा घेत रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी ७ जणांची टोळी गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केली. गरजूंना २० हजार रुपयामध्ये एक रेमडेसिविर विक्री करणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी ५ रेमडेसिविर जप्त केले.
योग्य तापमानात हे रेमडेसिविर ठेवले नाही तर वाया जातील ही बाब लक्षात घेऊन आघाव यांनी पोलीस कॉलनीत राहणारे शिपाई दादासाहेब झारगड यांच्या घरातील फ्रीजमध्ये इंजेक्शन ठेवले. दुसऱ्या दिवशी हे इंजेक्शन औषधी निरीक्षकांच्या ताब्यात देताना त्यांनी ही इंजेक्शन रुणांना द्या, तुम्हाला जी काही कागदपत्रे लागतील ती आम्ही देतो असे सांगितले. या इंजेक्शनमुळे रुग्णांचे प्राण वाचले तर कारवाईबद्दल समाधान लाभेल असे सांगताना आघाव यांना गहिवरून आले.