पुन्हा भारनियमन
By Admin | Updated: October 1, 2014 00:33 IST2014-09-30T23:43:20+5:302014-10-01T00:33:43+5:30
परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे.

पुन्हा भारनियमन
परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. ऐन नवरात्रीमध्ये भारनियमन सुरु केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण राज्यभरात कोठे, किती वीज पाठवायची याचा सर्वस्वी निर्णय ठाणे जिल्ह्यातील एैरोली येथील केंद्राकडून घेतला जातो. गेल्या महिन्यात सर्वत्र पाऊस झाला. यानंतर सध्या कडक उन्हास नागरिक सामोरे जात आहेत. यातच विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात पावसाने काहीसा ताण दिल्यानंतर शेतातील पिकांसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा आवश्यक आहे. या महिन्यात शेतीपंपाच्या अचानक वाढलेल्या वापरामुळे सर्वत्र विजेची मागणी व पुरवठा यात तफावत होत आहे. या कारणास्तव सदरील भारनियमन सुरु करण्यात आले असले तरी महावितरणला नवरात्रीचा विसर पडलेला आहे. सक्तीचे भारनियमन परभणी शहर व ग्रामीण भागात काही दिवसांपासून सुरु करण्यात आले. यात शहरी भागात साडेपाच तास तर ग्रामीण भागात आठ ते नऊ तास भारनियमनास सुरुवात झाली आहे.
परभणी शहर विभागाचे १८ फिडर असून यातील आठ फिडर संपूर्णत: भारनियमनमुक्त आहेत. परंतु, या सक्तीच्या भारनियमनात आठ फिडरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसताना ग्राहकांना वाढीव वीज बिल आकारण्यात येते.
मीटर रिडींग न घेताच आरएनए किंवा डोअर लॉकच्या नावाखाली वाढीव बिल येत आहे. यासाठी ग्राहक बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारत आहेत. तर काही जणांना पूर्ण बिल भरुनही वाढीव बिल, जादा वापर युनिट लावण्यात येत आहेत.
अशातच महावितरणने परभणीकरांना पुन्हा भारनियमनाचा दणका दिला आहे. सध्या निवडणुकीची धामधूम व नवरात्रोत्सव या सणासुदीच्या काळात होत असलेल्या भारनियमनाचा फटका मात्र नागरिक व शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)