अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या
By Admin | Updated: April 3, 2017 22:30 IST2017-04-03T22:26:50+5:302017-04-03T22:30:02+5:30
बीड : शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील ज्योती आजिनाथ केदार या २० वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पेटवून दिले होते.

अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या
बीड : शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील ज्योती आजिनाथ केदार या २० वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पेटवून दिले होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमवारी सकाळी माहेरकडील लोक आक्रमक झाले. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या दिला.
ज्योती हिचा सहा महिन्यापूर्वी अजिनाथ केदार याच्याशी विवाह झाला होता. २९ मार्च रोजी तिला सासरच्यांनी पेटवून दिले होते. यामध्ये ती ९४ टक्के भाजली होती. तिच्या मृत्यूपूर्व जवाबावरून पती अजिनाथ, सासरा नारायण, सासू कुसूम, दीर भगवान केदार यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
पोलिसांनी अजिनाथला अटक केली असून, उर्वरित तिघे फरार आहेत. ज्योतीच्या मृत्यूनंतर माहेरच्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ज्योतीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देत, थेट अधीक्षक कार्यालय गाठले. कार्यालयाबाहेर ठिय्या देत आरोपींना अटक करा, अशी मागणी लावून धरली. यामुळे तणाव निर्माण झाला होेता. पोलीस प्रशासन आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केली. तीन आरोपींना अटक का होत नाही ? असा सवाल ज्योतीचे वडील विठ्ठल साहेबराव बडे व नातेवाईकांनी उपस्थित केला.
यासंदर्भात अधीक्षक जी. श्रीधर यांना लेखी निवेदन देण्यात आले. आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच नातेवाईकांनी ज्योतीचा मृतदेह स्वीकारला. तिच्यावर पोलीस बंदोबस्तात गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)