आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By Admin | Updated: January 5, 2017 02:26 IST2017-01-05T02:26:43+5:302017-01-05T02:26:43+5:30

करंटवाला मोरपंखाच्या विक्रीत मोठी दलाली मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका फर्निचर व्यवसायिकाची १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप

Rejecting the anticipatory bail of the accused | आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

करंटवाला मोरपंखाच्या नावे १३ लाख ५० हजाराने फसवल्याचे प्रकरण
नागपूर : करंटवाला मोरपंखाच्या विक्रीत मोठी दलाली मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका फर्निचर व्यवसायिकाची १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मुंबई सांताक्रूझ येथील एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांचे न्यायालयाने फेटाळून लावला.
जसीम अहमद अन्सारी (४१), असे आरोपीचे नाव असून तो मूळचा इंदूर येथील रहिवासी असून हल्ली मुक्काम त्याचा सांताक्रूझ येथे आहे. अखिलेश रामजी पांडे , असे फसवणूक झालेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव असून ते निपाणी सोनेगाव येथील रहिवासी आहेत.
या फसवेगिरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०१६ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ११४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुकेश ऊर्फ हिरालाल रतनलाल गजभिये (४२) रा. बारसेनगर अटक करण्यात आलेली आहे. त्याचा बुधवार ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड होता. जसीन मोहम्मद अन्सारी, राजू खान, संतोष यादव आणि माजीद खान हे या प्रकरणातील पाहिजे असलेले आरोपी असून त्यापैकी जसीन याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
प्रकरण थोडक्यात असे की, मुकेश गजभिये हा १६ आॅगस्ट २०१६ रोजी पांडे यांच्या दुकानात गेला होता. त्याने स्वत:चा परिचय मुंबईच्या जेजे ग्रुप आॅफ कंपनीचा को-आॅर्डिनेटर, असा करून दिला होता. जसीम अन्सारी हा या कंपनीचा प्रबंध व्यवस्थापक असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने पुढे असेही सांगितले होते की, राजू खान आणि संतोष यादव यांच्याकडे करंटवाला मोरपंख आहे. त्याचे व्हिडिओही त्याने दाखवले. हा मोरपंख खुद्द आमची कंपनीच २०० कोटी रुपयांमध्ये विकत घेणार आहे. ही कंपनी थेट पार्टीसोबत सौदा करीत नाही, मध्यस्थामार्फत ती सौदा करीत असते. या सौद्यात मध्यस्थाला १५ टक्के कमिशन दिले जाणार आहे. या सौद्यासाठी मुकेशने पांडे आणि त्यांच्या मित्रांना लखनौ येथे नेऊन एका बड्या हॉटेलमध्ये थांबवले होते. या ठिकाणी त्याने आणखी एक आरोपी माजीद खानची मोरपंखाचा टेस्टर म्हणून ओळख करून दिली होती. राजू आणि संतोष यांच्याकडून पंख घेऊन तो माजीदने टेस्ट करून करंट असल्याचे सांगितले होते. आरोपींनी पांडे यांना विश्वासात घेऊन मुव्हमेंट अमाऊंटच्या नावाखाली १२ लाख ५० हजार आणि टेस्टिंगच्या वेळी राजू खान आणि संतोष यादव यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले होते. एकूण १३ लाख ५० हजार रुपयांनी आरोपींनी पांडे यांची फसवणूक केली.
न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. काळे हे आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Rejecting the anticipatory bail of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.