विद्यापीठाचा पुन्हा प्रभारी कारभार
By Admin | Updated: February 10, 2015 00:33 IST2015-02-10T00:18:20+5:302015-02-10T00:33:10+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि बीसीयूडी संचालक सोमवारी सायंकाळी संशोधन कार्यासाठी स्पेनला रवाना झाले

विद्यापीठाचा पुन्हा प्रभारी कारभार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि बीसीयूडी संचालक सोमवारी सायंकाळी संशोधन कार्यासाठी स्पेनला रवाना झाले. त्यामुळे अन्य प्राध्यापकांकडे या दोन्ही पदांचा प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. शिवाय प्रभारी कु लसचिव पदाचा कार्यभारही बदलण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा नव्या प्रभारींच्या खांद्यावर आला आहे.
स्पेनच्या दौऱ्यामुळे १६ फेब्रुवारीपर्यंत प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे अर्थशास्त्र विभागातील वरिष्ठ प्रा. डॉ. विनायक भिसे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. प्रभारी बीसीयूडी संचालकपदाची सूत्रे डॉ. के. व्ही. काळे यांच्याकडून डॉ. वि. ल. धारूरकर यांनी स्वीकारली. शिवाय डॉ. काळे यांच्याकडूनच प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार डॉ. गणेश मंझा यांनी स्वीकारला. विद्यापीठाचा कारभार गेल्या काही दिवसांपासून प्रभारींवर पडत असल्यामुळे कामाचा वेग काहीसा मंदावत असल्याचे चित्र दिसून येते. फायलींचा निपटारा होत नसल्यामुळे अनेकांवर उशिरापर्यंत काम करण्याची वेळ येत आहे. यामध्ये आता नव्याने भर पडली आहे.
विद्यापीठातील प्रभारी कुलसचिवपद म्हणजे संगीत खुर्चीच झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या खुर्चीवर प्रभारींना बसविल्यावर अवघ्या काही दिवसांतच उठविले जात असल्याचे दिसून येत आहे.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे हे एक आठवड्याच्या अभ्यास, संशोधन कार्यासाठी स्पेनला रवाना झाले आहेत. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या दौऱ्यात ‘युनिव्हर्सिटी आॅफ दि कॉम्पेस्टोला’ व ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’ या दोन विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या अंतर्गत संशोधक, प्राध्यापकांचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.