सोयीच्या राजकारणाला लगाम घालू

By Admin | Updated: July 31, 2016 01:11 IST2016-07-31T01:04:48+5:302016-07-31T01:11:07+5:30

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रूजलेली आहेत. मात्र, सोयीच्या राजकारणासाठी वैचारिक विरोधक असतानाही जिल्ह्यात आमच्यातीलच काहींनी निवडणुकीपुरत्या अभद्र युत्या केल्या

Reinforce convenient politics | सोयीच्या राजकारणाला लगाम घालू

सोयीच्या राजकारणाला लगाम घालू


विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रूजलेली आहेत. मात्र, सोयीच्या राजकारणासाठी वैचारिक विरोधक असतानाही जिल्ह्यात आमच्यातीलच काहींनी निवडणुकीपुरत्या अभद्र युत्या केल्या. पक्ष म्हणून याचा फटका शिवसेनेला वारंवार सोसावा लागला. निवडणुकांमध्ये असे सोसीचे राजकारण करणाऱ्यांना यापुढे लगाम घालू, असे सांगतानाच भाजपने मागील दोन वर्षांत मित्रपक्ष शिवसेनेबरोबर विश्वासघातकी राजकारण केल्याचा आरोपही सेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी केला.
खोचरे यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी संवाद साधला. १९६० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. मार्मिकच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सेना अग्रेसर होती. तेव्हा सामाजिक संघटना असलेले हे संघटन पुढे राजकारणात येईल, असे कुणाच्या मनातही आले नव्हते. मात्र, १९८५ पासून मराठवाड्यात सेनेची पाळेमुळे रूजू लागली. उस्मानाबाद जिल्ह्यावर प्रारंभी शेकाप आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. मात्र, त्याही काळात प्रभावी विरोधक म्हणून शिवसेनाच होती. १९८९ मध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुका शिवसेनेने प्रथमच गांभिर्याने लढण्याचा निर्णय घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांकडे मुंबई येथील विभाग प्रमुख दशरथ शिर्के, हरिश्चंद्र पाटील यांनी विशेष लक्ष घातले होते. सेनेनेही त्यावेळी दत्ताजी साळवी, गजानन किर्तीकर, सुभाष देसाई, मधुकर सरपोतदार, सुधीर जोशी असे पहिल्या फळीतील नेत्यांना जिल्ह्यात पाठविले. या मेहनतीला यश आले आणि सेनेच्या तब्बल १०५ सरपंचांवर गुलाल पडला. ही बातमी थेट मुंबईपर्यंत धडकली आणि त्यावरून शिवसेना नेते आणि शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे झाले. बाळासाहेबांना हे समजल्यानंतर त्यांनी खरेच १२५ निवडून आलेत का, याची माहिती घेतली. आणि त्यानंतर सर्व नवनियुक्त सरपंचांना दसरा मेळाव्यासाठी मुंबईला घेऊन या, असा आदेश दिला. शिवाजी पार्कवरील मेळाव्यात मुख्य व्यासपीठाशेजारी उस्मानाबाद जिल्ह्यातील या सरपंचांसाठी खास पेंडॉल उभारण्यात आला होता. या सर्वांचा बाळासाहेबांनी स्वत: सत्कार केला आणि तेथूनच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात शिवसेना बळकट होण्यास सुरूवात झाली. १९९० साली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर झालेली सभाही अशीच ऐतिहासिक होती.
जिल्ह्यात सेनेची ताकद आहे ती तेव्हापासून. मात्र, मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चुकाही झाल्या. याचा फायदा प्रतीस्पर्धी पक्षांना मिळाला. अशा चुका यापुढे होवू नयेत याची दक्षता आणि काळजी घेण्याचे काम आता सुरू झाले असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकावर प्रचंड प्रेम करायचे. त्याची काळजी घ्यायचे आणि प्रसंगी खडे बोलही सुनवायचे. बाळासाहेबांचेच अनेक गुण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्येही आहेत. मात्र, उद्धव ठाकरे तडकाफडकी बोलत नाहीत. योग्य वेळ आल्यावर ते निर्णय घेतात. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र ते आवर्जुन कदर करतात, असाच आपला अनुभव असल्याचे सांगत बाळासाहेबांनंतर शिवसैनिकांना त्यांनी भरकटू दिले नाही, तर संघटन अभेद्य ठेवले. सेना-भाजपा आज सत्तेत असली तरी भाजपाने कायम सेनेला दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. याची खदखद सर्वसामान्य शिवसैनिकांत आहे. यातूनच उद्या स्वबळावर निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्ते तळमळीने कामाला लागतील, असा विश्वास व्यक्त करीत सेनेची बांधिलकी जनतेशी आहे, सत्तेशी नाही, असे स्पष्टीकरण देत आगामी निवडणुकांत चांगले यश मिळेल, असा विश्वासही खोचरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Reinforce convenient politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.