पावसासाठी ग्रामस्थांचे साकडे
By Admin | Updated: August 21, 2014 23:19 IST2014-08-21T21:22:06+5:302014-08-21T23:19:52+5:30
हिंगोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणासाठी ज्याप्रमाणे ठाण मांडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपोषण केले

पावसासाठी ग्रामस्थांचे साकडे
हिंगोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणासाठी ज्याप्रमाणे ठाण मांडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपोषण केले जाते. अगदी त्याचप्रमाणे हिंगोली तालुक्यातील भांडेगावासियांनी मारोती मंदिरासमोर पावसासाठी ठाण मांडले आहे. तपश्चर्येची फलश्रुती चांगल्या वृष्टीच्या रूपाने होईपर्यंत साखळी उपोषणाप्रमाणे ग्रामस्थ ही प्रार्थना करीत आहेत.
मृगनक्षत्राच्या अडीच महिन्यानंतरही पाऊस रूसलेलाच असल्याने खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आणि शेतकऱ्यांचे अवसान गळाले. लाखो रूपये खर्च करून मोकळे झाल्याने शेतकऱ्यांना देव दिसायला लागले. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धावा सुरू झाला. कोणी देवांना पाणी घालू लागले, कोणी भंडारा करू लागले. आपापल्या परीने प्रत्येकजण वरूणराजाच्या कृपेसाठी प्रार्थना करू लागला आहे. त्याप्रमाणे भांडेगाववासियांनी १९ आॅगस्टपासून थेट मारोतीच्या मांदिरात प्रार्थना सुरू केली. दिवसभर अन्नाचा कणही न ग्रहण करता ही प्रार्थना सुरू आहे. दुसऱ्या दिवशी अन्य ग्रामस्थ प्रार्थनेला बसतात. गुरूवारी या तपश्चर्येचा तिसरा दिवस होता. यापूर्वी एकदा पावसाने डोळे वटारले तेव्हा अशाच प्रकारची प्रार्थना करण्यात आली. यंदाही पावसाच्या आशेने रामचंद्र जगताप, शिवाजी जगताप, नामदेव जगताप, विजय काला, गणपत जगताप, अनिल तोडेवाले, विश्वनाथ पवार आदी २० ग्रामस्थ प्रार्थना करीत आहेत. (प्रतिनिधी)
रामचंद्र जगताप यांनी तीन दिवसांपासून अन्नाचा कणही ग्रहण केलेला नाही. शिवाय त्यांनी मंदिरातच ठाण मांडले आहे. पाऊस येत नाही, तोपर्यंत ते प्रार्थना करणार आहेत. - ग्रामस्थ, भांडेगाव