समांतरपुढे पालिका प्रशासन हतबल
By Admin | Updated: December 14, 2015 23:58 IST2015-12-14T23:53:03+5:302015-12-14T23:58:22+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा समांतरचा मुद्दा गाजला. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली निघत नसल्याबद्दल

समांतरपुढे पालिका प्रशासन हतबल
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा समांतरचा मुद्दा गाजला. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली निघत नसल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी गोलमोल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच कंपनीला मनपाने आतापर्यंत किती पैसे दिले याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे सदस्य आणखीनच आक्रमक झाले. अखेर कोल्हे यांनी समांतरची कंपनी कामेच करत नाही, मी तरी काय करू, असे हतबल उद्गार काढले.
समांतर कंपनीच्या कारभाराबाबत सध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेतही पडले. नगरसेवक सय्यद मतीन, माधुरी अदवंत, उपमहापौर प्रमोद राठोड, विकास एडके, नंदकुमार घोडेले आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. पाठपुरावा करूनही पाणीपुरवठ्याची कामे होत नसल्यामुळे या सदस्यांनी प्रशासनाला कात्रीत पकडले.
दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. जलकुंभांचे काम तीन दिवसांत सुरू होईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता देतात; परंतु त्यानंतरही काम सुरू होत नाही, असे अनेक मुद्दे सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी कंपनीला पत्र दिले आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोललो आहे, अशी मोघम उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या उत्तरांमुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतरही कोल्हे यांनी कंपनीच काम करीत नसल्याचा राग आळवला. शेवटी सदस्यांनी आम्हाला कंपनीशी देणे घेणे नाही, त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे, आम्ही तुम्हालाच जाब विचारणार, अशी भूूमिका घेतली. अडचणीत आलेल्या कोल्हे यांनी कंपनी काम करीत नाही, म्हणूनच आपण त्यांना नोटीस बजावली आहे, असा खुलासा केला. त्याला उपमहापौर राठोड यांनी आक्षेप घेतला.
कंपनीला नोटीस तर आता आयुक्त साहेबांनी दिली आहे. तुम्ही वर्षभर काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याच्या उत्तरात कोल्हे यांनी आपण कंपनीला नोटिसा देत असतो, असे सांगितले. त्यावर महापौर त्र्यंबक तुपे यांनी याआधी तुम्ही कंपनीला किती नोटिसा दिल्या याची माहिती विचारली.
त्यानंतर कोल्हे यांनी आपले शब्द मागे घेत याआधी आपण नोटीस नाही, पण वेळोवेळी पत्रे दिली आहेत, असे सांगितले. याच दरम्यान काही सदस्यांनी समांतरला मनपाने आतापर्यंत किती पैसे दिले, याची माहिती विचारली.
कोल्हे यांनी ती माहिती देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे या विषयावर बराच वेळ चर्चा सुरू राहिली. अखेर महापौरांनी कोल्हे यांना समज देऊन यापुढे कंपनीकडून योग्य पद्धतीने काम करून घ्या, काम होत नसेल तर कारवाई करा, असे आदेश दिले.