पीए म्हणून शिक्षकाची नियमबाह्य नियुक्ती
By Admin | Updated: December 11, 2014 00:43 IST2014-12-10T23:56:01+5:302014-12-11T00:43:06+5:30
माजलगाव : बालकाचा शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियम २००९ कलम २७ नुसार शिक्षकाला इतर कामासाठी नियुक्ती करता येत नाही,

पीए म्हणून शिक्षकाची नियमबाह्य नियुक्ती
माजलगाव : बालकाचा शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियम २००९ कलम २७ नुसार शिक्षकाला इतर कामासाठी नियुक्ती करता येत नाही, असे असताना देखील शिक्षकाला पंचायत समितीच्या सभापतीचा पीए म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती नियमबाह्य असून, गटविकास अधिकाऱ्यांनी आरटीई कायद्याची पायमल्ली केली आहे.
पंचायत समितीचे सभापती यांचे स्वीय सहायक म्हणून शिक्षक सुंदर राठोड यांची मागील तीन वर्षांपासून नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली आहे. बालकाला शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियम २००९ च्या कलम २७ नुसार शिक्षकांना जनगणना, राष्ट्रीय आपत्ती आणि निवडणुका यासारख्या कोणत्याही कामासाठी नियुक्त करण्यात येऊ नये, असे सक्त आदेश दिलेले आहेत. असे असताना देखील सुंदर राठोड यांची सभापतीचे स्वीय सहायक म्हणून गटविकास अधिकारी के.ए. पांढरे यांनी नियुक्ती केली आहे. तीन वर्षांपूर्वी सभापती मनीषा गायकवाड यांचे व आता अनिता थावरे यांचे स्वीय सहायक म्हणून २ जुलै रोजी ४१२/२०१४ या पत्र क्रमांकानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे. राठोड हे स्वीय सहायक झाल्यापासून त्यांनी अद्यापही शाळेचे तोंड पाहिलेले नाही. तसेच शिक्षकांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या व इतर शालेय कामात ढवळाढवळ करुन मानसिक त्रास देत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. या शिक्षकाची नियुक्ती तात्काळ रद्द करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मागील दहा वर्षांपासून सुंदर राठोड यांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. आरटीई कायद्याची पायमल्ली करुन अध्यापनाऐवजी शासकीय पदाधिकाऱ्यांचे पीए म्हणून नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा प्रकरणात वरिष्ठ अधिकारी लक्ष घालतील का? आणि दोषींवर कारवाई करतील का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. याबाबत माजलगाव तालुक्यात चर्चेला उधाण आले असून, नियुक्ती रद्द करण्याची मागणी होत आहे. सुंदर राठोड यांना स्वीय सहायक म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस सभापतींनी केली होती. त्यामुळे मी त्यांची नियुक्ती केली आहे. या अगोदरही त्यांची स्वीय सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, असे गटविकास अधिकारी के.ए. पांढरे यांनी सांगितले. (वार्ताहर)४
सुंदर राठोड या शिक्षकाला सभापतीचे पीए म्हणून नियुक्ती दिली आहे. ही नियुक्ती नियमबाह्य आहे.
४नियमबाह्य नियुक्ती असतानाही ती रद्द करण्यासाठी सभापतींकडूनच संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिक्षकांमधून केला जात आहे.
४आरटीई कायद्याची पायमल्ली करून शिक्षकाची नियमबाह्य नियुक्ती करणाऱ्या गटविकास अधिकारी पांढरे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.