मयत व्यक्तींना घेऊन गृहनिर्माण संस्थेची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:31 IST2017-03-03T01:30:47+5:302017-03-03T01:31:30+5:30
लातूर : दोन मयत व्यक्तींना घेऊन सिग्नल कॅम्प येथे सिंधू अपार्टमेंट हौसिंग सोसायटी निर्माण केली असून सोसायटीच्या नोंदणी ठरावाच्या बैठकीला मयत व्यक्तींची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे़

मयत व्यक्तींना घेऊन गृहनिर्माण संस्थेची नोंदणी
लातूर : दोन मयत व्यक्तींना घेऊन लातूर शहरातील सिग्नल कॅम्प येथे सिंधू अपार्टमेंट को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी निर्माण केली असून सोसायटीच्या नोंदणी ठरावाच्या बैठकीला मयत व्यक्तींची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे़ ठरावावर मयत व्यक्तींच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या ठोकल्या आहेत़ यामुळे बैठकीचा व हाऊसिंग सोसायटीच्या स्थळ पाहणीचा अहवाल देणाऱ्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत़
सिंधू अपार्टमेंट को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नोंदणीसाठी प्रवर्तकांची बैठक ६ आॅगस्ट २०१६ रोजी झाली़ या बैठकीला जम्बु विठ्ठलराव चावरे आणि शामसुंदर खटलोया या मयतांची उपस्थिती असल्याचे दर्शविण्यात आले़ चावरे यांचे निधन २३ फेबु्रवारी २०१४ रोजी तर खटलोया यांचे निधन २५ आॅगस्ट २००७ मध्ये झाले असताना हाऊसिंग सोसायटी करण्याचा ठराव या दोघांच्या उपस्थितीत झाल्याचा घेण्यात आला़ त्या ठरावावर सूचक आणि अनुमोदक म्हणून या दोघांच्या सह्याही ठोकण्यात आल्या आणि हा प्रस्ताव नोंदणीसाठी ३१ आॅगस्ट २०१६ रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय लातूर येथे दाखल करण्यात आला़
प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या निबंधकांनी २८ नोव्हेंबर २०१६ रोजी सहकार अधिकारी बी़एच़ शिंदे यांना हौसिंग सोसायटीचे स्थळ व सभासदांच्या भेटी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले़ त्यानंतर सहकार अधिकाऱ्यांनी ७ डिसेंबर २०१६ रोजी स्थळ व सभासदांची पाहणी केल्याचा अहवाल निबंधकांकडे सादर केला़ स्थळ पाहणीत सहकार अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या १३ प्रवर्तकांच्या भेटी घेवून तसेच सोसायटीच्या संबंधित स्थळाची पाहणी करून अहवाल सादर करणे अपेक्षित असते़ मात्र सहकार अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवर्तकांनी केलेल्या ठरावानुसार अहवाल दिला आणि मोकळे झाले़ या अहवालानुसार सहायक निबंधक सहकारी संस्था निबंधकांनी ७ डिसेंबर २०१६ रोजी सिंधू अपार्टमेंट को़आॅप हौसिंग सोसायटीला (सिग्नल कॅम्प) नोंदणीचे प्रमाणपत्र बहाल केले़
दरम्यान, सिंधू अपार्टमेंट को़-आॅप हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी मीनाक्षी नंदकिशोर काळे यांनी अॅड़ जीवन करडे यांच्या मार्फत सहायक निबंधक संस्था कार्यालयात याबाबत तक्रार केली आहे़ या तक्रारीवरून सहायक निबंधक सहकारी संस्थेने सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकांना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे़ खुलासा सादर न केल्यास संस्थेविरूद्ध अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले आहे़