कुलसचिवांचा राजीनामा

By Admin | Updated: June 2, 2015 00:26 IST2015-06-02T00:26:32+5:302015-06-02T00:26:32+5:30

औरंगाबाद : डॉ. गणेश मंझा यांनी शनिवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे सादर केला

Registrar's resignation | कुलसचिवांचा राजीनामा

कुलसचिवांचा राजीनामा


औरंगाबाद : डॉ. गणेश मंझा यांनी शनिवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे सादर केला. दरम्यान, कुलगुरूंनी अद्यापही राजीनामा स्वीकारलेला नाही.
विद्यापीठातील विविध संघटनांचे राजकारण सहन झाले नाही, हेच राजीनामा देण्याचे कारण असल्याची विद्यापीठ वर्तुळात सोमवारी दिवसभर चर्चा ऐकावयास मिळाली. मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नती हवी आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रभारी कुलसचिवांच्या टेबलावर पडून आहे. ते दोन्ही प्रस्ताव विनाविलंब मार्गी लावावेत, यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला होता. शिवाय याच संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या चौकशीचा अहवालही अंतिम झाला असून, त्यासंबंधी कारवाई होऊ नये, याबाबतही डॉ. मंझा यांच्यावर दबाव वाढला होता. एकीकडे कुलगुरू हे नि:पक्ष व पारदर्शी प्रशासन चालविण्याच्या बाजूचे असताना संघटनांच्या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर आपल्या करिअरला धोका होऊ शकतो, हे ओळखून डॉ. मंझा यांनी राजीनामा दिला.
दरम्यान, यासंबंधी डॉ. मंझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दुसरीकडे मागासवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नती देऊ नये, या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी कुलगुरूंना निवेदन सादर केले आहे.
सोमवारी कुलगुरूंनी विद्यापीठ मालमत्ता विभागामध्ये बांधकामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीस प्रभारी कुलसचिव डॉ. मंझा यांची उपस्थिती होती, हे विशेष!

Web Title: Registrar's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.