आठ दिवसांत शाळांची नोंदणी करा
By Admin | Updated: April 20, 2016 00:18 IST2016-04-20T00:11:11+5:302016-04-20T00:18:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ‘आरटीई’नुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया कोलमडली आहे. महिनाभराचा कालावधी होत आला; पण अजूनही शाळांनी यासंबंधीची आॅनलाईन नोंदणी केलेली नाही.

आठ दिवसांत शाळांची नोंदणी करा
औरंगाबाद : जिल्ह्यात ‘आरटीई’नुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया कोलमडली आहे. महिनाभराचा कालावधी होत आला; पण अजूनही शाळांनी यासंबंधीची आॅनलाईन नोंदणी केलेली नाही. येत्या आठ दिवसांत संपूर्ण शाळांची नोंदणी सक्तीने करून घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देत सोमवारी उपशिक्षणाधिकाऱ्यांना या संघटनेच्या नेतृत्वाखाली बालकांनी घेराव घातला.
यासंबंधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी निवेदन केले की, जिल्ह्यातील शाळांबरोबरच जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बालकांचा शिक्षण हक्क कायदा पायदळी तुडविला आहे. शाळा नोंदणीचे वेळापत्रक जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी होत आला; पण अद्यापही २५ टक्के शाळांनीदेखील आॅनलाईन नोंदणी केलेली नाही. त्यामुळे २५ टक्के प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेले वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना संकेतस्थळावर शाळेचे नाव दिसत नाही. यासंदर्भात शिक्षण विभागही जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्यामुळे शाळांचे फावते.
एकंदरीत समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील पालक चिंतेत असून, २५ टक्के जागांसाठी खरेच प्रवेश प्रक्रिया होणार आहे की शाळा व शिक्षण विभाग केवळ वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सरसकट सर्व विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या तसेच सर्व शिक्षण मंडळांच्या पात्र शाळांची आॅनलाईन नोंदणी सक्तीने करून घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी मांडली. यावेळी सोबत आलेल्या बालकांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. याप्रसंगी बालकांसह ऋषिकेश देशमुख, सुमित शिंदे, अंकुश साबळे, विजय देशमुख, प्रतीक खरात, सिद्धांत जाधव आदींची उपस्थिती होती.