विभागीय पथकाचा मोसंबी बागा पाहणी दौरा
By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:22:10+5:302014-09-18T00:41:36+5:30
औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली.

विभागीय पथकाचा मोसंबी बागा पाहणी दौरा
औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली.
जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमणावर मोसंबीची फळगळ होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर याची पाहणी करण्यासाठी कृषी सहसंचालक कार्यालयाने विभागीय पथकाची स्थापना केली होती. या पथकाने आज औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, इब्राहीमपूर, पिंप्री राजा, पाचोड, आपतगाव, भालगाव आदी गावांना जाऊन तेथील मोसंबीच्या बागांची पाहणी केली.
पथकात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, विभागीय कृषी अधीक्षक रमेश गोसावी, जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे, उप विभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र कुलथे यांचा समावेश होता. पावसाच्या पाण्याचा निचरा करून बागांची स्वच्छता ठेवल्यास मोसंबी फळांची गळ थांबविण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितले.
एका बहराची फळे झाडावर असताना दुसऱ्या बहरासाठी बाग ताणावर सोडू नये, तसेच झाडाची क्षमता पाहून फळे धरावीत व जास्तीच्या फळासाठी अन्न मूलद्रव्याचे व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारसीनुसार करून ताबडतोब रिडोमिल या बुरशी नाशकाची फवारणी करावी, फळगळीची वा कुठल्याही प्रकारची समस्या शेतकऱ्यांना आल्यास कृषी विभाग व कृषी विद्यापीठाशी संपर्क केल्यास निश्चितच मदत मिळेल, असे जनार्दन जाधव यांनी सांगितले. पाहणी दौऱ्याच्या पथकाच्या निष्कर्षानुसार ही फळगळ बुरशीजन्य रोगापासून झालेली असून गळीचे प्रमाण अल्प स्वरूपात आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन रमेश गोसावी व पंडित लोणारे यांनी केले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी राठोड, सुभाष पठाडे, उत्तम गोरडे, रामेश्वर घोडके, रामेश्वर पवार, भगवान गावंडे, भारत पवार आदी मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.