आयुक्तांच्या बदलीचे ‘सस्पेन्स’ कायम
By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-08-01T00:56:33+5:302014-08-01T01:08:39+5:30
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले.

आयुक्तांच्या बदलीचे ‘सस्पेन्स’ कायम
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले. त्यांनी सकाळपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रावर सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन संचिका हातावेगळ्या करण्याचा सपाटा सुरू केला. अनेक तुंबलेल्या संचिका ते निकाली काढत होते. शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात, संजय पवार यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक मो. रा. थत्ते यांना घेऊन आयुक्तांनी महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा केली.
बदलीबाबत आयुक्तांना विचारले की, आता वेलकम बॅक समजायचे का? यावर त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलवली. मात्र, बदली झाली की नाही. पूर्णविराम मिळाला की चर्चा सुरू राहणार आहे, यावर ते म्हणाले, शासनाचा नोकर आहे, कुठेही काम करावे लागेल. मागील काही दिवसांमध्ये नागपूरला गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात डेंग्यूची साथ पसरलेली असताना पदाधिकारी मात्र, आज आयुक्तांना घेरून संचिकांवर स्वाक्षऱ्या घेताना दिसून आले. साथरोगांपासून शहराला मुक्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर निर्णय घेणे गरजेचे असताना पदाधिकारी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना गराडा घालून बसले होते. त्यावेळी पदाधिकारी वॉर्डातील संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आयुक्तांकडे गेले होते.
आता लक्ष १ आॅगस्टकडे
निवडणूक आयोगाने ३१ जुलैपूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत राज्य शासनाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत किंवा १ आॅगस्ट रोजी मनपा आयुक्तांची बदली होऊ शकते. जर तसे झाले नाही, तर त्यांची बदली विधानसभा निवडणुकीनंतरच होईल, असा अंदाज आहे.
संचिका आणि स्वाक्षऱ्या
आयुक्तांची बदली होणार नाही असे समजावे तर मग त्यांनी खोळंबलेल्या संचिका निकाली काढण्याची घाई कशासाठी चालविली हा प्रश्न आहे. बदली होणार असेल तेव्हाच अशी घाई होत असते, हे तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्या बदलीनंतरच्या अनुभवावरून दिसते.
संशोधन केंद्रावर सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, त्र्यंबक तुपे, बन्सीलाल गांगवे आदी संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आले होते. आठवड्यापासून आयुक्त पालिकेत नसल्यामुळे संचिका त्यांच्या स्वाक्षरीविना तुंबू शकतात. मात्र, आयुक्तांची बदली होणार नसेल तर घाई कशाला, असाही प्रश्न आहे.